रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभहस्ते पार पडले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, कोल्हापूर खंडपीठाचे पहिले न्यायाधीश मकरंद कर्णिक, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, न्यायाधीश माधव जामदार, राज्यमंत्री योगेश कदम, प्रभारी प्रमुख न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी, बार कौन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत, संग्राम देसाई, अॅड. मिलिंद लोखंडे आणि उमेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
advertisement
बाबासाहेबांच्या तालुक्यातच न्यायालयाची भव्य इमारत उभी
भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. त्यांच्या तालुक्यातच ही न्यायालयाची भव्य इमारत उभी राहिली आहे, हे अभिमानास्पद आहे. भारतीय राज्यघटनेचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून, मंडणगड व रत्नागिरीवासियांसाठी हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. न्याय मंदिरासह बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा येथे उभारण्यात आला आहे. वंचितांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचले आणि आता त्यांच्या पुतळ्याच्या साक्षीने न्यायदानाचे कार्य होणार आहे. हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे मंदिर आहे, घटनेचे मंदिर आहे. या पुतळ्यामुळे न्यायदानाचे कार्य सामाजिक समतेच्या मूल्यांशी जोडले जाईल, असे ते म्हणाले.
भूषण गवई यांनी अनेक न्यायालयांना मान्यता दिल्याने ही न्यायालये सुरू करता आली
रत्नागिरी जिल्हा आणि सत्र न्यायालय तसेच मंडणगड बार असोसिएशनचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. मुंबई उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांचेही आभार मानतो. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असताना या न्यायालयाला मान्यता दिली होती. भूषण गवई यांनी राज्यातील अनेक न्यायालयांना मान्यता दिल्याने आम्हाला ही न्यायालये सुरू करता आली. त्यामुळे या कार्याचे श्रेय त्यांनाच जाते. ते पुढे म्हणाले की, या न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन देखील गवई यांच्या हस्ते झाले होते आणि आज त्यांच्या हस्तेच उद्घाटन झाले आहे. हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. आमच्या सरकारने आणि बांधकाम विभागाने अत्यंत सक्षमपणे आणि वेगाने हे काम पूर्ण केले आहे. भूमिपूजनावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि आज पुन्हा तेच मुख्यमंत्री या नात्याने उपस्थित आहेत, हा देखील एक शुभ योगायोग आहे, असे शिंदे म्हणाले.
शेवटच्या घटकाला न्याय मिळावा हीच बाबासाहेबांची संकल्पना
देशातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे आणि विकासाला गती मिळाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातले, त्यांचेही अभिनंदन करतो. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा हीच बाबासाहेबांची संकल्पना होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत भूषण गवई काम करत आहेत. त्यांनी या इमारतीसाठी काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार करून मानवी संवेदनांचा आदर्श घालून दिला आहे असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी भूषण गवईंच्या कार्याचे विशेष कौतुक केले.