मुंबई : आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आशिया कप क्रिकेटजगत आणि क्रीडा प्रेमींमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची उत्सुकता लागली आहे. तर, दुसरीकडे आता त्यावरुन राजकारण तापू लागलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने भारत-पाक सामन्यावरून भाजपवर निशाणा साधला असून रविवारी आंदोलन जाहीर केले आहे. पहलगाममधील 26 भगिनींचे कुंकू पुसलं गेलं, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम केली. ही कारवाई अजूनही सुरू असताना पाकिस्तानसोबत सामना कसा काय? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
advertisement
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाक सामन्यावर टीका केली. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सांगितले की, पाकिस्तानसोबतचे संबंध तोडण्याची घोषणा पंतप्रधान मोदी, शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी केली. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण, रक्त आणि क्रिकेट कसे काय एकत्र येऊ शकतात असा सवाल संजय राऊत यांनी केला. सरकार सोडून द्या, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, बजरंग दल, विहिंप यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन राऊत यांनी केले.
ठाकरे गटाकडून आंदोलनाची घोषणा...
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने या सामन्यावर बहिष्कार घातला असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. 'माझं कुंकू माझा देश' अशी मोहीम, आंदोलन करणार आहोत. सिंदूर सन्मान आंदोलन ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी हे सिंदूर विसरले आहेत. त्यांना राज्यातील घराघरातून सिंदूर पाठवण्याचे आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
भारत-पाक क्रिकेटला समर्थन देणारे त्यांनी आपला अंतरआत्मा तपासून पाहावा. भाजप नेत्यांची मुलं अबूधाबीला सामना पाहायला जाणार आहे. तुम्ही हिंदुत्ववादी आहात, तर किमान भूमिका तरी जाहीर करा, असे आव्हानही राऊत यांनी दिले. भारत-पाक सामन्यावर सर्वाधिक जुगार खेळला जातो. मोठी आर्थिक उलाढाल होते. राजस्थान आणि गुजरातमधून हा जुगार खेळला जातो. यामध्ये भाजपचे काही नेते सहभागी असतात असा आरोपही संजय राऊतांनी केला.