विमानसेवा १३ डिसेंबरपर्यंत रद्द
इंडिगोच्या रात्रीच्या मुंबई - छत्रपती संभाजीनगर - मुंबई या विमानाची सध्या १३ डिसेंबरपर्यंतची बुकिंग बंद करण्यात आली आहे. या विमानाची बुकिंग आता १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे, याचाच अर्थ हे विमान १३ डिसेंबरपर्यंत रद्दच राहणार आहे. ऐन प्रवासाच्या दिवशी, सोमवारी, मुंबईचे रात्रीचे विमान रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना रस्ते मार्गाने मुंबईला ये-जा करावी लागली.
advertisement
बंगळूरूची सेवाही तीन दिवस थांबली
इंडिगो कंपनी आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी बंगळूरूसाठी विमानसेवा पुरवते. मात्र, ही बंगळूरू-छत्रपती संभाजीनगर-बंगळूरू विमानसेवा ९, ११ आणि १३ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. विमानसेवा अचानक रद्द झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून मुंबई आणि बंगळूरूला जाणाऱ्या प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था करावी लागली. यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला आहे.
तुम्ही जर अजूनही प्रवासासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आताच सोय करा. विमानसेवा रद्द झाल्यामुळे रेल्वेवर अधिक जास्त भार आला आहे. त्यामुळे रेल्वेचं तिकीट मिळणं कठीण झालं आहे. बस देखील अव्वाच्या सव्वा भाडं घेत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे प्रवाशांचा संताप आणि गैरसोय झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून इंडिगोच्या सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड, अपुरे कर्मचारी यामुळे विमानसेवा रद्द करण्यात आले आहेत.
