शुक्रवार, 9 जानेवारी दुपारी 2:28 वाजता नागेवाडी टोलनाका येथील चेक पोस्टवर वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी एम.एच. 21 बी.एफ. 8733 या क्रमांकाची हुंदाई क्रेटा गाडी संशयास्पद वाटल्याने पथकाने थांबवली. गाडीची कसून झडती घेतली असता, त्यामध्ये 98 लाख रोख रक्कम आढळून आली. एसएसटी पथक आणि चंदनझिरा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने या रकमेचा पंचनामा केला.
advertisement
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड आढळल्यास त्याची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक आहे. त्यानुसार आचारसंहिता कक्षाने छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालकांना (तपास) पाचारण केले आहे.
जिल्हाधिकारी तथा आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी रोकडचा वापर होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम सध्या चंदनझिरा पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आली असून, आयकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.






