जालना : राज्यभरातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. जालना जिल्ह्यामध्येही या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 19 जूनपासून सकाळी साडेपाच वाजेपासून विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी घेतली जाते. या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून विद्यार्थी जालना शहरांमध्ये दाखल होत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची मोठी हेळसांड होती. अनेक विद्यार्थी बस स्टँड रेल्वे स्टेशन एखादे मंदिर किंवा रस्त्याच्या बाजूलाच झोपत असल्याचे चित्र दिसत आहे.
advertisement
विद्यार्थ्यांची होत असलेली अवस्था पाहून जालना शहरातील रेनील फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. जालना शहरात भरती प्रक्रियेसाठी आलेल्या तब्बल 200 ते 300 मुलांची व्यवस्था या फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. जालना शहरातील प्रतीक गावंडे हे या फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत.
19 जून रोजी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी 18 जून रोजी दाखल झाले. यापैकी अनेक विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवण्याची कुठलीही सोय नव्हती. तेव्हा प्रतीक गावडे यांनी आपल्या घरातीलच रिकाम्या असलेल्या पाच ते सहा खोल्या या विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी देऊ केल्या. त्याचबरोबर कॉलनीतीलच पाच-सहा महिलांच्या मदतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 जून रोजी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. अनेकांना जेवणाची व राहण्याची व्यवस्था होत असल्याचे माहीत झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी गावडे यांच्याशी संपर्क केला. त्याचबरोबर शहरातील सामाजिक संस्थाही गावडे यांच्या मदतीला धावून आल्या. यामुळे काल तब्बल 200 ते 300 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
प्रतीक गावडे नेमकं काय म्हणाले -
मी स्वतः या अडचणींमधून गेलो आहे. 2017 नंतर मी एमपीएससी करत होतो, तेव्हा अशा अनेक अडचणी आल्या. आपत्ती व्यवस्थापनाचा कोर्सही मी केला आहे. त्यामुळे कोरोना काळात मी जवळपास दोन वर्ष प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे आताही विद्यार्थ्यांची होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी आम्ही सामाजिक भावनेतून काम करतोय. या कामात अनेक नागरिकांची मदतही होत आहे, असे प्रतीक गावडे यांनी सांगितले.
उमेदवारानं व्यक्त केली ही भावना -
मी नांदेडवरून आलो आहे. याआधी 2 वेळा मी भरती केली आहे. या आधीचे अनुभव खूप वाईट राहिले आहे. रस्त्याच्या बाजूला बऱ्याच वेळा झोपलो आहे. पुरेशी झोप न झाल्यामुळे भरती प्रक्रियेत देखील 100 टक्के देऊ शकत नाही. त्यामुळेच कधी 2 मार्क, कधी 3 मार्कमुळे पोलीस होण्याचे स्वप्न भंग पावले. आता मात्र, चांगली व्यवस्था झाल्याने भरती प्रक्रियेत 100 टक्के देण्याचा प्रयत्न असेल, असं नांदेड येथून पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराने सांगितले.