विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. हा निधी राज्यातील रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, तसेच नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बल, वंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. परंतु अर्थमंत्र्यांच्या घोषणेत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठा घोळ असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
advertisement
कागदावर आकडे पण खर्चच होत नाही, जयंत पाटील यांचा धक्कादायक दावा
जयंत पाटील म्हणाले, "चालू आर्थिक वर्षात मांडलेल्या अर्थसंकल्पात सरकारने एक विक्रम केला असा उल्लेख मी मागील वेळी केला होता. त्यावेळी महसुली तूट ही ४५ हजार ८९१ कोटी रुपयांची होती. आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुन्हा पुरवणी मागण्या मांडल्या. त्या ५७ हजार ५०९ कोटीच्या आहेत. सरकारचे बहुमत असल्याने या पुरवणी मागण्या मंजूर होतीलच. त्यावेळी सरकारला १ लाख ३ हजार ४०० कोटी रुपये कमी पडणार आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या पुरवणी मागण्या मिळून सरकारने अजून एक नवा विक्रम रचला आहे".
"याचा अर्थ सरळ आहे, पुरवणी मागण्या समोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही. यापुढे हिवाळी अधिवेशन देखील येणार. पुढचा अर्थसंकल्प मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार. म्हणजे राज्याची महसूली तूट हे दीड किंवा दोन लाख कोटींपर्यंत पोहोचवतील. याचा अर्थ असा की, सरकारला सर्व आकडे कागदावर दाखवणे आवश्यक आहे. नाहीतर ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत किंवा ज्यांचे देणं बाकी आहे असे लोकं एकतर आत्महत्या करतील अन्यथा यांच्या मागे लागतील. म्हणून सरकारने राज्याच्या अर्थकारणामध्ये एवढ्या मोठ्या तुटीपर्यंत पोहोचण्याचे धाडस केले आहे", असे जयंत पाटील म्हणाले.
सरकारला आता अर्थसंकल्पाचे संतुलन टिकवणे अवघड झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने राज्यावरील बोजा वाढला आहे. आर्थिक संतुलन ढासळले आहे. यामुळे राज्यातील गरिबांवर, दुर्लक्षित समाजावर अन्याय होतो आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग यांच्यावर खर्च होणारा पैसा कागदावर दाखवला जातो आणि ३१ मार्चला कळते यावर काहीच पैसा खर्च झालेला नाही. तीच पुनरावृत्ती यावर्षी सरकार करते आहे असे मला वाटते, असा दावा जयंत पाटील यांनी केला.