हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यानच्या चर्चेत जयंत पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार, रखडलेले खातेवाटप, निवडणूक काळात भाजप आणि महायुतीने दिलेली आश्वासने, राज्यातील रखडलेले प्रश्न आदी विषयांवर जयंत पाटील यांनी फटकेबाजी केली. जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांचे सभागृहात आगमन झाले. त्यावेळी आपलीच स्तुती करत होतो, पण तुम्ही दिलेली आश्वासने पाळत नाही, अशी माझी तक्रार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
advertisement
फडणवीससाहेब, तुम्ही अजूनही मला सोबत घेऊन गेले नाहीत, जयंतरावांच्या मनात काय?
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यावरील कर्जाचा भार कमी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र सध्य परिस्थितीत राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर बोलायला नको. जनतेला शंभरीपार इंधन खरेदीची सवय लागलेली आहे. महाराष्ट्रात मोठा प्रकल्प यावा अशी जनतेची इच्छा आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम दहा वर्षांपासून रखडले आहे.नितेश राणे आत्ताच मंत्री झालेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे. राज्यातील अनेक रखडलेले प्रश्न बहुमताने सत्तेत असलेले शासन सोडवेन, अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रकल्प मोठे असतात, त्यामुळे आश्वासने देताना दिलेल्या कालावधीत ती पूर्ण होतील की नाही, याचा विचार व्हायला व्हावा, असे सांगतानाच ट्रान्सहार्बर महामार्गावर सोबत जाऊ, असे देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते. मात्र ते अजूनही सोबत घेऊन गेले नाहीत, असे जयंत पाटील म्हणाले. दुसरीकडे जयंत पाटील यांच्या सूचक वक्तव्यानंतर आमदारांनी त्यांना इशारों इशारों में क्या हो रहाँ हैं? अशा शब्दात छेडले.
कोण दिल्लीत, कोण गावाला गेले, नेमके काय सुरू होते?
सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला पण अजूनही खाते वाटप झाले नाही. मोठा जनादेश मिळाल्यानंतर लगेच सरकार स्थापन होईल असे वाटत होते. सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना काही दिल्लीला गेले, काही समारंभात येत नव्हते, काही गावी जाऊन बसले, अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली.
कर्जमाफीच्या मुद्द्यांवरुन जयंत पाटलांची फटकेबाजी
निवडणुकीत आमचा प्रचार चुकीच्या ट्रॅकवर होता, हे निकालातून सिद्ध झाले, अशा शब्दात विधानसभेतील पराभवावर जयंत पाटील यांनी कबुली दिली. देवेंद्र फडणवीस साहेब आपण सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आपले देवाभाऊ आपल्याला सरसकट कर्जमाफी देणार असा समज जनतेत असल्याचे सांगून कर्जमाफीच्या घोषणेची आठवणही जयंत पाटील यांनी फडणवीस यांना करून दिली.
