कल्याण डोंबिवलीमधील कल्याण शीळ मार्गालगतच्या दावडी येथील सेंट जॉन शाळेसमोरील डॉ. आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी तनिष्का रेसिडन्सी नावाने इमारत उभारली. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर यशवंत भीमराव आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, रमाताई तेलतुंबडे यांची नावे आहेत.
आपल्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यानंतर आंबेडकर कुटुंबाने भूमाफियाच्या विरोधात तक्रार केली. तसेच रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना देखील याविषयी अवगत केले.रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी आंबेडकर यांच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे तक्रार करून तोडक कारवाई करण्याची मागणी केली.
advertisement
इमारतीचे बांधकाम सुरू असताना एका विकासकाने अर्धवट बांधकाम सोडले. हे बांधकाम दुसऱ्या विकासकाने पूर्ण केले. बांधकाम पूर्ण झाल्यावर सात मजली इमारतीत अनेक जण राहू लागले. आंबेडकर कुटुंबाने आणि पदाधिकारी नवसागरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता महापालिका प्रशासनाच्या वतीने आय प्रभागाचे अधीक्षक नितीन चौधरी यांनी विकासक (बिल्डर) ललित महाजन यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. येत्या २० मे रोजी तोडक कारवाई प्रस्तावित आहे.