कल्याण: ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी तब्बल 17 ड्रग्स तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. विशाखापट्टणम ते कल्याण असा पसरलेला अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजा, वाहने, पिस्तूल, वॉकी-टॉकीसह तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या टोळीविरोधात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे तसेच तेलंगणा राज्यातही अनेक गुन्हे नोंद आहेत.
advertisement
कल्याण जवळील बल्यानी येथे राहणारा गुफारान शेख हा या टोळीचा म्होरक्या राहत होता .खडकपाडा पोलिसांनी गुफारान शेखसह टोळीतील तब्बल 17 जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे ठाणे जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला असून, अमली पदार्थ तस्करीविरोधातील ही कारवाई पोलिसांसाठी ‘माइलस्टोन’ ठरली आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांनी महिन्यात गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं या तरुणाने गांजा कुठून घेतला याची चौकशी पोलिसांनी सुरू केली असता गांजा तस्करीचे धागेदोरे कल्याण मुंबई ठाणे नाशिक पुणे पासून थेट विशाखापट्टणमच्या जंगलापर्यंत पोहोचले.
कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली एसीपी कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे डीसीपी स्कॉड चे पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने या रॅकेटचा तपास सुरू केला. हा तपास जसा पुढे जात होता तसा तसा पोलीस ही चक्रावले.आतापर्यत पोलिसांनी ११५ किलो गांजा, पिस्तुले, काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह आरोपी संपर्कासाठी वापरत असलेली वॉकी टॉकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या गुन्ह्याची पाळेमुळे थेट विशाखापट्टणम येथील जंगलापर्यत पोचल्याचे कळताच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखालील खडकपाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या टीमने थेट धडक देत टोळीचा म्होरक्या गुफरान हन्नान शेख या टीटवाळा बनेली परिसरात राहणाऱ्या आरोपीसह १३ जणांना अटक केली आहे.
या टोळीमध्ये गांजा पुरवठा करणाऱ्या बरोबरच पेडलर आणि छोट्या विक्रेत्याचा समावेश आहे. हि टोळी ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गांजा विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींविरोधात 20 पेक्षा जास्त गुन्हे मुंबई ठाणे पुणे नाशिक सह तेलंगणा राज्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल असून या सर्व आरोपीं विरोधात आता मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करत कारवाई सुरु करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एका महिला आरोपीचा समावश आहे. इतक्या मोठ्या टोळी विरोधात करण्यात आलेली जिल्ह्यातील पहिली आणि राज्यातील दुसरी कारवाई असून या माध्यमातून तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून सोडविण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले..