नागपूर: विजयादशमीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवकांना संबोधित केले. संघाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज संघ स्वयंसेवकांना काय संदेश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात विविध मुद्यावर भाष्य केले.
advertisement
सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात त्यांनी विशेषतः शेजारील देशांमध्ये सध्याच्या राजकीय गोंधळावर, बदलत्या जागतिक परिदृश्यावर आणि भारताच्या भूमिकेवर भाष्य केले. त्यांनी नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या देशांमधील आंदोलनांवर चिंता व्यक्त केली. या अशांत चळवळी त्यांच्या लोकांच्या हितासाठी नसून बाह्य शक्तींच्या उद्दिष्टांसाठी असल्याचा आरोप केला.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, "आपले शेजारी देश केवळ शेजारी नाहीत. ते आपले स्वतःचे आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल आत्मीयतेची भावना आहे. तेथे होणारी अशांतता चिंतेचा विषय आहे. आपण हे शिकले पाहिजे की लोकशाही मार्गांनीच बदल शक्य आहे. तथाकथित क्रांती उद्दिष्टे साध्य करत नाहीत, तर बाह्य शक्तींच्या हितासाठी आहेत. अशा शक्ती भारतात त्यांची शक्ती वाढवत असल्याचा इशाराही त्यांनी दिला. जगाला भारताकडून यावर उपाय शोधण्याची अपेक्षा आहे. मानवता नैतिकदृष्ट्या नव्हे तर भौतिकदृष्ट्या प्रगती करते. प्रत्येकाने विकास करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पहलगाम हल्ल्यामुळे मित्र आणि शत्रू कळाले...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना, सरसंघचालक भागवत यांनी म्हटले की, या घटनेने भारताला सतर्क राहण्यास शिकवले. पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की आपण प्रत्येक देशाशी मैत्री केली पाहिजे, परंतु आपल्या स्वतःच्या सुरक्षेबद्दल आपण आणखी जागरूक असले पाहिजे. या घटनेनंतर, आपला मित्र कोण आहे आणि कोण नाही हे देखील स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज जग भारताकडून या परिस्थितीवर तोडगा काढण्याची अपेक्षा करते. त्यांनी यावर भर दिला की नैतिक विकास हा भौतिक विकासाइतकाच महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने विकास केला पाहिजे, असे डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले.
स्वदेशी...टॅरीफवर काय म्हणाले भागवत?
डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले की, आमचा देश आर्थिक क्षेत्रात पुढे आला पाहिजे यासाठी सर्वांमध्ये इच्छा आकांक्षा दिसतात. पण ज्या पद्धती आहेत त्यामुळे श्रीमंती आणि गरिबी यात दरी वाढत चालली आहे. अमेरिकेने टॅरीफ आणले त्याचा मार सर्वांवर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रात सर्व प्रकारचे संबंध असतात,एकटा देश जिवंत राहू शकत नाही. स्वदेशी आणि स्वावलंबन याला पर्याय नाही, आम्हाला आत्मनिर्भर व्हावे लागेल.
तरीही आंतरराष्ट्रीय संबनधावर परिणाम होऊ नये असे निर्णय घ्यावे लागतील असेही सरसंघचालकांनी म्हटले.
मोहन भागवतांनी सांगितली हिंदू राष्ट्राची व्याख्या...
हिंदू राष्ट्राच्या व्याख्येवर बोलताना मोहन भागवत म्हणाले, "हिंदू धर्म कधीही राज्यावर आधारित नव्हता. आपण हिंदू राष्ट्र आहोत, तो जात, पंथ किंवा समुदायाच्या आधारावर विभागला जाऊ शकत नाही." हिंदू समाज हा वसुधैव कुटुंबकमच्या उदारमतवादी विचारसरणीचा रक्षक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणात शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या अशांततेबद्दल चिंता व्यक्त केली. तर भारताची जबाबदारी आणि "वसुधैव कुटुंबकम" चे त्यांचे दृष्टिकोन देखील अधोरेखित करण्यात आले. जगाला शांतता आणि स्थिरतेचा मार्ग दाखवण्यात भारत आणि हिंदू समाज महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.