महायुती आणि महाविकास आघाडीने या दोन्ही आघाड्यांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. वाढलेल्या मतदानाने कोणाचे पारडं जड झाले आहे, हे 23 नोव्हेंबर रोजी निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या वाढीव मतदानासाठी काही फॅक्टर कारणीभूत आहेत.
'या' फॅक्टरमुळे मतदानाची टक्केवारी वाढली?
वाढलेले मतदान सरकारविरोधात?
सरकारविरोधात जनभावना असली की त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटते. आतापर्यंत वाढलेल्या मतदानाचा साधारणपणे असाच अंदाज काढलो जातो. काही अपवाद वगळता वाढीव मतदान हे सरकार बदलण्यासाठी असते. महायुती सरकारविरोधात लोकांनी आपला संताप मतदानातून व्यक्त केलाय का, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
advertisement
संघ परिवार, हिंदुत्ववादी संघटनांचे आवाहन
यंदा काही मुस्लीम धर्मगुरूंकडून वोट जिहादच्या घोषणेचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर काही साधू संतांनी हिंदू हिताला जो प्राधान्य देईल अशा पक्षाला मत देण्याचं आवाहन केलं होतं. त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वोट जिहाद विरोधात धर्मयुद्ध असल्याचे जाहीर सभेत म्हटले. त्याच्या परिणामी मतदानाचा टक्का वाढल्याची चर्चा आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे मतदानाची टक्केवारी वाढली?
महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही परिणाम असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर मतदानाच्या वेळी महिलांचाही उत्साह दिसून आला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेने महिलांकडून महायुतीला मतदान झाले असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी मतदानात सहभाग नोंदवला असल्याचीही चर्चा सुरू आहे.
राज्यातील मतदानाची टक्केवारी वर्षनिहाय :
वर्ष मतदानाचे प्रमाण टक्केवारीत
1962 - 60.36
1967 - 64.84
1972 - 60.63
1978 - 67.59
1980 - 53.02
1985 - 59.17
1990 - 62.26
1995 - 71.69
1999 - 60.95
2004 - 63.44
2009 - 59.68
2014 - 63.38
2019 - 61.44
2024 - 65.11
