महेंद्र राख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. हद्दपारीची शिक्षा भोगून महेंद्र राख शुक्रवारी पुन्हा कोल्हापुरात आला होता. तो कोल्हापुरात येताच एका टोळीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. तलवार, एडका, लोखंडी रॉड आणि काठ्यांचा वापर करून आरोपींनी महेंद्र राख याच्यावर एकापाठोपाठ वार केले. या हल्ल्यात राख याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कोल्हापूरच्या फुलेवाडीत घडली.
advertisement
हा सगळा प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओत सात ते आठ हल्लेखोरांची टोळी महेंद्र राख याचा पाठलाग करताना दिसत आहे. हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी महेंद्र एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हल्लेखोरांनी पकडून त्याला रस्त्यावर आणलं आणि बेदम मारहाण केली.
यावेळी काही हल्लेखोरांनी धारदार तलवारी आणि कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की पुढच्या काही क्षणातच महेंद्र राख याचा जीव गेला. हा प्रकार काल मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास घडला. यावेळी घटनास्थळी काही लोक उपस्थित होते, त्यांनी महेंद्र हल्लेखोरांच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोर अधिक आक्रमक असल्याने कुणीही त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत केली नाही. एका महिलेशी लग्न करण्याच्या कारणातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.