कोल्हापूरच्या शाही गणरायाचे अर्थात छत्रपती घराण्यातील गणेशाचे स्वागत करण्यासाठी सकाळपासूनच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. साधारण दीड फूट उंचीची सुंदर गणेशमूर्ती पालखीतून वाजतगाजत आणण्यात आली. दरवर्षीप्रमाणे छत्रपती घराण्याचे प्रमुख मानकरी शाही लवाजम्यासह गणपती बाप्पाला पापाची तिकटी कुंभार गल्लीपासून नवीन राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ घेऊन आले.
Ganesh Chaturthi: गणेशाची ही 108 नावं, 10 दिवसांपर्यंत करा याचा जप, आयुष्यातील सर्व अडचणी होतील दूर
advertisement
यावेळी पारंपारिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पुढे घोडेस्वार मानकरी होते. राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ कसबेकर यांच्या दारात थोडा वेळ थांबून घेऊन बाप्पाला नवीन राजवाड्यात आणण्यात आले. यावेळी आपल्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि घरातील सदस्य उपस्थित होते. यानंतर विधिवत पूजाअर्चा करुन गणपती बाप्पाला आत घेण्यात आले.
जनतेची सर्व विघ्नं दूर व्हावीत
पुढे राजवाड्याच्या दालनात गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करुन घरातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी जनतेला गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. बोलताना शाहू महाराज यांनी जनतेची सर्व विघ्नं दूर व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर गणेशोत्सव हा सर्वांनी एकत्रित येऊन भावना व्यक्त करण्याचा मोठा उत्सव असून कोणतेही शुभ कार्य सुरू करत असताना गणेशाची उपासना करण्याची आपली परंपरा आहे, असे देखील शाहू महाराज म्हणाले.
66 किलो सोनं आणि 295 किलो चांदी, देशातील सर्वात श्रीमंत बाप्पाचे पाहा Photos
गणेशोत्सवात सर्वजण गणपती बाप्पांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी तशाच उत्साहात नवीन राजवाड्यावर आम्ही राजघराण्यातील सदस्य सण साजरा करत असतो. यावर्षी देखील मोठ्या उत्साही वातावरणात परंपरेप्रमाणे नवीन राजवाड्यात उत्सवाची सुरुवात झालेली आहे, असे मत व्यक्त करत संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
राजघराण्यातील गणपतीची सजावट
सर्वत्र मोठ्या जल्लोषात गणेशाची आराधना केली जात असताना नवीन राजवाड्यात मात्र शाही गणेशोत्सव सध्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. त्यानुसारच यंदाही राजवाड्याच्या दालनात गणेश मूर्तीसाठी साजेशी सजावट करण्यात आली होती. एका छोट्या टेबलवर शाहू छत्रपती घराण्याचे गणपती बाप्पा विराजमान झाले होते. तर गणेशासमोर धातूचा मोठा नंदी देखील ठेवण्यात आला होता.