कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांच्या यादीतील मुकुटमणी म्हणजे रंकाळा तलाव. कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या या रंकाळा तलावाला वर्षभरात हजारो पर्यटक भेट देत असतात. कोल्हापुरात आले की पहिल्यांदा अंबाबाई मंदिर या ठिकाणी देवीचे दर्शन घ्यायचे आणि मग रंकाळा तलावाशेजारी फेरफटका मारून मूड फ्रेश करायचा. याच रंकाळा तलावाचा इतिहास खूप जुना आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी युक्त असा आहे.
advertisement
कोल्हापूर शहरात असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवी मंदीराच्या पश्चिम दिशेला हा रंकाळा तलाव आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांपासून ते रात्री शतपावली करायला येणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला हा रंकाळा आपलासा वाटतो. तलावाच्या सभोवताली असणाऱ्या चौपाटी आणि बागांमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी तर दुपारच्या वेळी रंकाळ्यातील मासे पकडण्यासाठी कठड्यावर काही नागरिकांची वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळत असते.
Peruchi Wadi : पेरुची वाडीत मिळते स्पेशल मिसळ थाळी, नाशिकच्या या ठिकाणाची परदेशातही चर्चा
काय आहे रंकाळ्याची महती?
श्री करवीर महात्म्य या प्राचीन ग्रंथातील उल्लेखानुसार श्री अंबाबाईने लोकांसाठी एका जलाशयाची निर्मिती केली. निर्मितीवेळी या जलाशयाचे नाव शुद्धाब्दी (शुद्ध पाण्याचा साठा) हे होते, असा उल्लेख आढतो. सातव्या शतका दरम्यान अंबाबाई देवीचे मंदिर बांधण्यास सुरुवात झाली. तर मंदिराचे मूळ वास्तू हे रंकाळ्यातीलच दगडांनी बांधले आहे. आठव्या आणि नवव्या शतकात मोठ्या भूकंपामुळे या ठिकाणी विशाल जलाशय निर्माण होऊन सध्याच्या रंकाळ्याचे मूळ स्वरूप पुढे आले. पुढे रंकभैरवाच्या नावावरून या जलाशयास 'रंकतीर्थ' हे नाव पडले. करवीर क्षेत्रात ज्याप्रमाणे लक्षतीर्थ, कोटीतीर्थ, विशालतीर्थ आहेत, त्याप्रमाणे हा रंकतीर्थ आहे. तर प्राचीन स्थळ कोशात या तलावाचे नाव रंकालय होते. याचेच पुढे रंकाळा असे नाव बनले. पुढे संस्थानकाळात कोल्हापुरच्या राजघराण्याकडून इतर अनेक वास्तू प्रमाणेच रंकाळ्याची देखील बांधणी शास्त्रशुद्ध पद्धतीने केली गेली.
कसा आहे रंकाळ्याचा परिसर?
रंकाळा तलावाच्या पूर्वेकडे संध्यामठ ही वास्तू, पश्चिमेला शालिनी पॅलेस दक्षिणेला निसर्ग सौंदर्याने भरलेला परिसर आणि उत्तरेला रंकाळा टॉवर, बाग बगीचा, चौपाटी आणि तलावाची नक्षीदार भिंत आहे. त्यापैकी संध्यामठ ही मंडपाप्रमाणे दगडी वास्तू रंकाळा तलावात आहे. संध्यावंदन करण्यासाठी या वास्तूची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. सध्या उन्हाळ्यात अतिप्रमाणात तलावाचे पाणी कमी झाल्यास या ठिकाणी चालत जाता येते. आतमध्ये शिवलिंग आणि गणेशाची प्रतिमा आहे.
तलावातील पाण्याचे उत्तम नियोजन
पूर्वी या रंकाळा तलावातील पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जात होते. तलावातील पाणी सायफन पद्धतीने आजूबाजूच्या तीन भागांमध्ये सोडले जात असे. त्याचे व्हॉल्व आजही रंकाळा परिसरात पाहायला मिळतात. तर रंकाळ्याचे बांधकाम एका बहुउद्देशीय धरणाप्रमाणेच करण्यात आली होती. त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित न करता त्याचा वापर करता यावा, यासाठी धुण्याच्या चाव्यांची रचना करण्यात आली होती. तलावापासून दीडशे मीटर अंतरावर कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी सुमारे 160 चाव्यांची योजना सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे.
रंकाळ्याच्या काठावरील शालिनी पॅलेस
रंकाळा तलावाच्या पश्चिम काठावर राजाराम महाराज दुसरे यांच्या कारकिर्दीत शालिनी राजेंच्या नावाने इस. 1931 ते 1934 या काळात बांधलेली शालिनी पॅलेस ही भव्य वास्तू आहे. संस्थान काळात आणि त्यानंतर ब्रिटिश काळातही या वास्तूचा वापर करण्यात आला. पुढे 1967 नंतरच्या काळात या वास्तूमध्ये हॉटेल शालीनी पॅलेस सुरू करण्यात आले. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या भव्य वास्तूमध्ये झाले आहे. सध्या ही वास्तु बंद करण्यात आली आहे.
पाण्याखाली सोन्याचे मंदिर?
रंकाळ्याच्या बाबतीत अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्यामधली एक म्हणजे हा रंकाळ्यामध्ये असलेल्या सोन्याच्या मंदिराबाबतची गोष्ट आहे. कारण रंकाळा तलावाच्या पाण्याखाली एक सोन्याचे मंदिर दडलेले आहे, असे म्हटले जाते. 1886 सालच्या आणि 1960 सालच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा गॅझेटर मध्ये याची स्पष्ट नोंद आढळून येते.
सध्या रंकाळ्याचा संबंध कोल्हापुरातील प्रत्येक घटनेशी येत असतो. तलावाच्या दक्षिणेकडील असलेल्या खाणींमध्ये शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या आणि घरगुती गणेश मूर्ती विसर्जित केल्या जातात. तर याच परिसरात अनेक परदेशी पक्षी स्थलांतर करुन येत असतात. दरम्यान या रंकाळा तलावाला अजूनच सुंदर बनवण्यासाठी परिसरात सध्या विविध प्रकारची सुशोभीकरणाची कामे देखील सुरू आहेत. दरम्यान या सर्व वैशिष्ट्यपूर्ण, ऐतिहासिक, निसर्गसंपन्न अशा गोष्टींमुळेच कोल्हापूरचा रंकाळा तलाव हा देश विदेशातील पर्यटकांसाठी आणि अवघ्या कोल्हापूरकरांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय बनून जातो.