कोल्हापूर : कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे, लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, मटन स्वस्त झालेच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे, या मागण्यांसाठी कोल्हापुरातून सायकल रॅली काढण्यात आली. कोल्हापुरात जे जे घडते त्याची चर्चा राज्यभर होत असते. आता या सायकल रॅलीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होतेय. विशेष म्हणजे गमतीशीर मागण्यांचे बोर्ड आणि चक्क अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो सायकलवर लावून ही रॅली काढण्यात आली. सामाजिक समस्यांकडे गंमतीशीर मार्गाने लक्ष वेधण्यासाठी ही अनोखी रॅली काढली.
advertisement
कोल्हापूरच्या खासबाग मैदान परिसरात प्रिन्स क्लब आहे. सामाजिक प्रश्न गमतीदार पद्धतीने मांडून लोकप्रबोधन करणाऱ्या या क्लबच्या पावरफुल चिक्कू मंडळाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली. मिरजकर तिकटी पासून ते पाच नद्यांचा संगमस्थान असलेल्या प्रयाग चिखली गावापर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली होती. प्रदुषण, नागरिकांकडून आरोग्याची होणारी हेळसांड अशा प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजक अशोक पवार यांनी सांगितले आहे.
मसाल्यांमुळे उजळेल भाग्य, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय माहितीयेत का? Video
कशी निघाली रॅली?
सायकलवर गमतीशीर बोर्ड लावलेल्या सायकल रॅलीची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. तर याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळेच हे सामजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची ही अनोखी पद्धत देशभर गाजत आहे. या रॅलीची सुरुवात चक्क अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून करण्यात आली. तर बाकीच्या सायकलींवर अनोखे बोर्ड लावण्यात आले होते. मिरजकर तिकटी इथून सुरू झालेली ही रॅली बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड-पापाची तिकटी-कुंभार गल्ली-तोरस्कर चौक-शिवाजी पूल-आंबेवाडी मार्गे चिखलीपर्यंत जाऊन पुन्हा मिरजकर तिकटी या ठिकाणी परत आली.
दीड टन वजन अन् 30 हजार रेडकांचा बाप, तब्बल 10 कोटींचा रेडा पाहिलात का? Video
या मागण्यांचे होते बोर्ड
या अनोख्या रॅली मध्ये सायकलवर खालीलप्रमाणे अनेक गमतीशीर बोर्ड लावण्यात आले होते.
1) लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे.
2) कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे.
3) मटन स्वस्त झालंच पाहिजे.
4) पेट्रोल फुकट मिळालंच पाहीजे.
5) बंबात लाकूड गुळगुळीत.
6) एकच मासा गाडगेभर रस्सा.
7) हवेवर गाड्या चालल्याच पाहिजेत.
8) आबा घुमिव.
9) ह्योच नवरा पाहिजे.
या रॅलीमध्ये लावलेल्या बोर्डांपैकी लग्नासाठी नवरी न मिळण्याच्या समस्येमुळे बरेच जण त्रस्त असतात. कोल्हापूर जिल्हा हा मुळात शेतीप्रधान जिल्हा असून याठिकाणी शेतकरी असलेल्या मुलांच्या लग्नाचा विषय गंभीर बनत चालला आहे. लोकप्रतिनधींनी याकडे लक्ष देऊन कोल्हापुरातील रोजगाराच्या संधीही वाढवल्या पाहिजेत, असेही मत यावेळी आयोजक रमेश मोरे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, यासह बाकीच्या गंमतीशीर मागण्यांची ही अनोखी रॅली सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनून गेली आहे.