कसे असणार नवे दर?
नव्या दरानुसार, मुंबई आणि पुणे येथे म्हैस दुधाचा दर प्रतिलिटर 72 रुपयांवरून 74 रुपये झाला आहे, तर कोल्हापुरात हा दर 66 रुपयांवरून 68 रुपये इतका झाला आहे. त्याचप्रमाणे, गायीच्या दुधाचा दर मुंबई आणि पुण्यात प्रतिलिटर 56 रुपयांवरून 58 रुपये, तर कोल्हापुरात 48 रुपयांवरून 50 रुपये करण्यात आला आहे. 'गोकुळ'च्या दुधाला कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे मोठी मागणी आहे. विशेषत: मुंबईत दररोज आठ लाख लिटर दुधाची विक्री होत असल्याने या दरवाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर ग्राहकांवर होणार आहे.
advertisement
गोकुळने निर्णय घेतलाच..
'गोकुळ'ने यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती, परंतु त्यावेळी विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. तसेच, मध्यंतरी गायीच्या दूध खरेदी दरातही वाढ करण्यात आली होती. मात्र, राज्यातील इतर दूध संघटना जसे की अमुल आणि मदर डेअरी यांनी 1 मे 2025 पासून दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केल्याने 'गोकुळ'नेही हा निर्णय घेतला आहे. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, तसेच दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास गोकुळ दूध संघाने व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना फायदा, ग्राहकांना भूर्दंड
कोल्हापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा मानला जातो. 'गोकुळ' दूध संघाने सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत विविध योजना आणि सुधारणा राबविल्या आहेत. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु ग्राहकांना मात्र याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबई आणि पुणे यांसारख्या महानगरांमध्ये दूध ही दैनंदिन गरज असल्याने दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
दरम्यान, दूध दरवाढीच्या निर्णयावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शेतकरी आणि दूध उत्पादकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर ग्राहकांमध्ये याबाबत नाराजी दिसून येत आहे. आता या दरवाढीमुळे बाजारपेठेतील स्पर्धा आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.