कोल्हापूर : राज्यभरात सध्या पोलीस दलातील भरती प्रक्रियेसाठी इच्छूक उमेदवारांची लगबग सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा पोलीस दलाकडून पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी भरती प्रक्रियेचं नियोजन करण्यात आलंय. येत्या 19 जूनपासून 27 जूनपर्यंत मैदानी चाचणी पार पडणार आहे आणि भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी उत्तम नियोजन केल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
advertisement
संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस दलाकडून भरती प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापुरात 19 जूनपासून 27 जूनपर्यंत पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक अशी एकूण 154 पदांसाठी ही प्रक्रिया पार पडेल. कोल्हापुरातील पोलीस कवायत मैदानात भरती प्रक्रियेसाठीची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
हेही वाचा : कॅमेरा अन् ती! फोटोग्राफर व्हायचं होतं, आज क्लिक करते लाखोंचं हास्य
कसं आहे भरतीचं नियोजन?
पोलीस शिपाई पदासाठी धावणे, गोळाफेक आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी वाहन चालवण्याची चाचणी पार पडेल. पोलीस कवायत मैदानावर या मैदानी चाचण्या घेतल्या जातील. दरम्यान, 154 जागांसाठी साधारण 12 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दररोज 1 हजार 400 उमेदवार अशा पद्धतीनं 9 दिवसांमध्ये संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलंय.
पारदर्शी भरती प्रक्रियेसाठी नियोजन
या संपूर्ण भरती प्रक्रियेत फेस रेक्ग्नेशन कॅमेरे, बायोमेट्रिक सिस्टिमद्वारेच उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याव्यतिरिक्त कॅमेऱ्यासमोरच मैदानी चाचण्या घेण्यात येणार आहेत. यात 1600 मीटर, 800 मीटर आणि 100 मीटर धावणे, तसंच गोळाफेक अशा पुरुष आणि महिला यांच्या चाचण्या पार पडतील. विशेष म्हणजे धावण्याच्या चाचणीवेळी रेडिओ फ्रिक्वेंसी आयडी टॅगचा वापर यंदा पोलीस दलाकडून करण्यात येणार आहे. याचा फायदा सर्व उमेदवारांना होईल. या टॅगमुळे प्रत्येक उमेदवाराच्या मैदानी चाचणीची अचून वेळ नोंदवली जाईल, असंही महेंद्र पंडित यांनी सांगितलं.
हेही वाचा : फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल, तासाला 615 प्रवासी करतात विनातिकीट प्रवास
कुठल्याही आमिषाला बळी पडू नका!
जिल्हा पोलीस दलातर्फे राबवण्यात येणारी भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे. भरतीविषयी जर कोणी काही आमिष दाखवत असेल किंवा चुकीच्या गोष्टी सांगत असेल. तर तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात, पोलीस नियंत्रण कक्षात किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. मेरीटनुसारच उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्णपणे पार पडेल. कुठल्याही आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये, असं आवाहन सर्व उमेदवारांना पोलीस अधीक्षकांनी केलं आहे.





