कोल्हापूर : कोल्हापुरात पूर परिस्थिती निर्माण व्हायला लागली की सर्व कोल्हापूरकर धास्तावतात. पंचगंगा नदीची पाणी पातळी किती आहे? शहरात पाऊस किती पडला? धरण क्षेत्रात पाऊस किती पडला? राधानगरी धरणाचे किती दरवाजे उघडले? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. मात्र पूर्वी हीच परिस्थिती फक्त एका परिमाणाने ओळखले जायची. पुराचा धोका वाढला हे फक्त एका गोष्टीवरून कोल्हापूरकरांना समजत असे. ती गोष्ट म्हणजे कोल्हापुरातील पंचगंगेची होणारी मच्छिंद्री. पंचगंगेची मच्छिंद्री झाली म्हणजे आता महापूर आला हे प्रत्येक कोल्हापूरकराला ज्ञात असे. मात्र आजकाल बऱ्याच जणांना ही मच्छिंद्री म्हणजे नेमकं काय असतं? याबद्दलच ठाऊक नाही.
advertisement
नवख्या माणसाला मच्छिंद्री झाली का? किंवा मच्छिंद्री हा शब्द अगदी वेगळा वाटतो किंवा हे काय आहे, हे कोणालाच कळत नाही. पण कोल्हापुरातल्या सामान्य नागरिकाला मच्छिंद्री म्हणजे काय, हे नेमकं कळतं. मच्छिंद्री झाल्याची स्थिती आल्यानंतर पंचगंगेला महापूर आला आहे, हेही प्रत्येक कोल्हापूरकर जाणतो.
शहरात घुसले पाणी, काय आहे कोल्हापुरातील पुराची सद्य परिस्थिती? नागरिकांना दिलासा मिळणार का? VIDEO
मच्छिंद्री म्हणजे नेमके काय?
कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर छत्रपती शिवाजी पूलाशी निगडित मच्छिंद्री शब्द आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शहराला जोडणारा पंचगंगा नदीवरील हा पूल आहे. सध्या वाहतुकीसाठी हा पूल बंद असून त्याच्या शेजारीच नवीन पूल बांधण्यात आला आहे. या पुलाला एकूण पाच कमानी आहेत. त्या पाच कमानी दगडी स्तंभावर आहेत. त्या दगडी स्तंभावर वरच्या बाजूला माशाच्या आकाराचा एक निमुळता दगड पुढे आलेला आहे. नदीचे पाणी पुराच्या वेळी इथे पर्यंत पाणी आले की मच्छिंद्री झाली, असे म्हटले जाते. त्या माशाच्या आकाराच्या दगडामुळेच हा पारंपरिक शब्द रूढ झालेला आहे. तिथपर्यंत पाणी आलं म्हणजे पंचगंगेला महापूर आला हे स्पष्ट होतं आणि ते अगदी शंभर टक्के खरे असतं, असे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद सांगतात.
मच्छिंद्री झाल्यावर कुठपर्यंत येतं पाणी?
पंचगंगा नदीला आलेला महापूर हा फक्त पुलाजवळ किंवा नदीच्या पात्राबाहेर येऊन या क्षणाला थांबत नाही. तर त्यावेळी पंचगंगा नदीचे पाणी शुक्रवार पेठेत घुसलेले असते. एकीकडे जयंती नाल्याचे पाणी शाहूपुरी कुंभार गल्लीत आलेले असते. तर बऱ्याचशा वाटा, रस्ते देखील यावेळी बंद झालेले असतात. त्यामुळे मच्छिंद्री हा शब्द असा एक परवलीचा शब्द आहे. ज्यामुळे 'मच्छिंद्री झाली' या एका वाक्यात कोल्हापूरच्या पंचगंगेच्या महापुराची स्थिती काय आहे, हे समजते, असेही काशीद यांनी स्पष्ट केले आहे.
Kolhapur Flood : कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पूरस्थिती कायम
छत्रपती शिवाजी पुलाचा इतिहास..
कोल्हापूर आणि रत्नागिरी यांना जोडणारा छत्रपती शिवाजी पूल हा सन 1874 ते 1878 या कालावधीत बांधला गेला. तब्बल चार वर्षांत उभारण्यात आलेला हा पूल राजश्री रामचंद्र महादेव आणि कंपनीने मेजर वॉल्टर मॉर्डन डफेट रॉयल इंजिनीअर्स या कंपनीच्या देखरेखीखाली बांधला होता. तर जी. एस. अँडरसन यांच्या कार्यकाळात पुलबांधणीला सुरुवात होऊन एफ. श्वेंडर या अधिकाऱ्याच्या कार्यकाळापर्यंत पूल बांधून पूर्ण झाला. शिवाजी महाराज चौथे यांचे नाव या पुलाला देण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामावेळीच कमानीवर दगडी माशाची एक जोडी कोरण्यात आली आहे.
दरम्यान, पूर्वी मच्छिंद्री झाली की यापुढे महापूराचे पाणी वाढणार नाही, असा समज असायचा. मात्र सध्या 2019 आणि 2021 सालच्या महापुरात पंचगंगेच्या पाण्याने कित्येक फुटांची पातळी गाठली होती. राजाराम बंधारा या ठिकाणी 43 फूट इतकी पंचगंगेची धोका पातळी आहे. त्याचवेळी साधारण 43 ते 44 फुटाला ही मच्छिंद्री होत असते. मात्र 2019, 2021 यावेळी 55 फुटांपेक्षा जास्त पाणीपातळी वाढली होती. त्यामुळे महापुराच्या सीमारेषाही बदलल्या असल्याचे पाहायला मिळते.