क्रिकेटच्या मैदानावर आपल्या दमदार खेळीने आणि विक्रमांनी भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रिकेटपटू विराट कोहली हा अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. संकेत पाटील हा असाच एक क्रिकेटवेडा तरुण. पण त्याच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली ती विराट कोहलीच्या एका वाक्यामुळे. एका व्हिडिओत विराटने सांगितलेली दररोज एक टक्का सुधारणा करा ही संकल्पना संकेतच्या मनाला भिडली. या साध्या पण प्रभावी विचाराने त्याला जीवनातील संधीचं सोनं करण्याची प्रेरणा दिली. संकेतने याच विचारावर आधारित द वन परसेंट थेअरी हे पुस्तक लिहिलं, जे नैराश्याच्या काळात तरुणांना आधार आणि प्रेरणा देणारे ठरत आहे.
advertisement
संकेत पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेला सामान्य तरुण. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यालाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. परंतु, विराटच्या त्या एका वाक्याने त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडवला. त्याने ठरवले की, तो स्वतःच्या अनुभवातून आणि प्रेरणेने इतरांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल. यातूनच द वन परसेंट थेअरी या पुस्तकाचा जन्म झाला. या पुस्तकात संकेतने स्वतःच्या अनुभवांसह छोट्या-छोट्या पावलांनी यश कसे मिळवता येते, याचे मार्गदर्शन केले आहे. नैराश्य, अपयश आणि आव्हानांना कसे सामोरे जायचे, याविषयी पुस्तकात सविस्तर माहिती आहे.
मला वाटले की, जर माझ्यासारख्या सामान्य मुलाला एका वाक्याने इतका बदल घडवता येतो, तर हा विचार इतरांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे संकेत सांगतो. त्याच्या या पुस्तकाला तरुणांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांसाठी हे पुस्तक एक प्रेरणास्थान ठरत आहे. संकेतने केवळ पुस्तक लिहिलेच नाही, तर स्वतःच्या कृतीतून हे सिद्ध केले की, जर मनात जिद्द असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही.
कोल्हापूरसारख्या शहरातून आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरून आलेल्या संकेतच्या या संकल्पनेमुळे अनेकांना थक्क केले आहे. भगवत गीतेवर आधार घेऊन केलेले हे पुस्तक असलेले हे पुस्तक द वन परसेंट थेअरी हे पुस्तक आजच्या तरुणाईसाठी एक मार्गदर्शक ठरेल यात काही वाद नाही.