कोल्हापूर : शेती म्हटलं की आपल्याला पिकांची शेती आठवते. मात्र सध्या वेगवेगळ्या प्रकारची शेती देखील केली जाते. यामध्ये कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देणारी शेती म्हणून मोत्यांच्या शेतीचा पर्याय समोर येऊ लागला आहे. त्यामुळेच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने मोती संशोधन आणि संवर्धन केंद्र सुरू केले आहे. याद्वारे विद्यापीठातच विद्यार्थ्यांना 'मोत्यांची शेती' पिकवण्याचे धडे मिळणार आहेत.
advertisement
खरंतर कोल्हापूर हा ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र याच कोल्हापुरातील शेतकरी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून वैविध्यपूर्ण शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच मोत्यांची शेतीमध्ये अवघ्या 25 ते 30 हजारांच्या गुंतवणूकीत लाखोंचा नफा मिळवता येऊ शकतो. मात्र त्याचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळेच नुकतेच शिवाजी विद्यापीठातील गोड्या पाण्यातील मोती संवर्धन आणि संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्राणीशास्त्र अधिविभागाच्या परिसरात हे केंद्र आहे.
कोल्हापूर विमानतळाचा हेरिटेज लूक, नव्या टर्मिनल इमारतीत काय आहे खास? पाहा Video
रोज अर्धा तास देऊन करता येते मोत्यांची शेती
शिवाजी विद्यापीठातील या केंद्राचे प्रकल्प समन्वयक डॉ. नितीन कांबळे आहेत. तर त्यांच्यासोबत मोत्यांची शेती विषयातील तज्ञ दिलीप कांबळे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कोल्हापूरच्या सडोली खालसा येथील दिलीप कांबळे हे गेली 8 वर्षांपासून गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती करतात. सुरुवातीला काही अपयश आल्यानंतर हळूहळू त्यावर मात केली. कोरोना काळात अगदी 25 ते 30 हजार रुपयांच्या अल्प भांडवलामध्ये त्यांनी यशस्वीरित्या मोत्यांची शेती पिकवली होती. इतक्या कमी गुंतवणुकीत त्यांनी मिळवलेल्या लाखोंच्या नफ्यामुळे सर्वत्र मोत्यांच्या शेतीचे आकर्षण निर्माण झाले होते. विद्यापीठातील या पर्ल कल्चरपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. दिवसभरात फक्त अर्धा तास वेळ देऊन ते आपला चांगला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करू शकतात, असे मोती उद्योग तज्ज्ञ दिलीप कांबळे यांनी सांगितले आहे.
कोल्हापूरचा विनायक देणार साहेबांना सल्ला, ब्रिटिश सरकारने सोपवली मोठी जबाबदारी, Video
मोत्यांच्या शेती बाबतीत मिळणार माहिती
शिवाजी विद्यापीठाचा प्राणीशास्त्र अधिविभाग हा रेशीम शेतीचा 'सॉईल टू सिल्क’ प्रकल्प, फुलपाखरू उद्यान आणि शोभेच्या मत्स्य उत्पादनाच्या प्रकल्पातून माहिती असे अनेक उपक्रम राबवत आहे. तर आता गोड्या पाण्यातील मोत्यांच्या उत्पादन व संशोधनाचे केंद्रही सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये सहसा नदीतून आणलेल्या शिंपल्यापासून मोती तयार होण्यापर्यंत सर्व क्रियांचा या केंद्रात सहभाग आहे. खरंतर मोती तयार करण्याचे काही प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे नैसर्गिकरित्या मोती तयार करणे आणि दुसरा आर्टिफिशियल मोती तयार करणे होय. तर कल्चर या संकल्पनेत एक फॉरेन बॉडी शिंपल्यात ठेवली जाते, जेणेकरून वेगवेगळ्या आकाराचे मोती त्याद्वारे मिळवता येतील. यासाठी दीड ते दोन वर्ष याचा कालावधी असतो. मोती तयार झाल्यानंतर त्याची विक्री केली जाऊ शकते. एकूणच मोती उद्योगाशी निगडित सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना यामधून शिकायला मिळू शकतात, असे या मोती उत्पादन आणि संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन कांबळे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी पर्ल फार्मिंग अर्थात मोत्यांची शेती या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश होऊन दरवर्षी विद्यार्थ्यांमधून किमान काही उद्योजक किंवा व्यावसायिक निर्माण होतील, अशी आशा या केंद्राच्या बाबतीत व्यक्त केली आहे.