कोल्हापूर : शिवकालीन युद्धकला हेच स्वराज्यातील मर्द मावळ्यांचे वैशिष्ट्य होते. आजही भारतातील ही युद्धकला जगभरात सर्वत्र प्रसिद्ध आहे. मर्दानी खेळांच्या नावाने हीच युद्धकला जपली गेली आहे. कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहरात तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून आजतागायत लहानथोरांनी हे मर्दानी खेळ अवगत केले आहेत. मात्र आज मर्दानी खेळांचे रुप सर्वत्र बदलताना पाहायला मिळत आहे.
advertisement
मर्दानी खेळ एक पारंपरिक कला
मर्दानी खेळ हा काही फक्त खेळ नसून ती एक माणसाला परिपूर्ण बनवणारी पारंपरिक कला आहे. अंगातील चपळता, बुद्धीचातुर्य, अवघड प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता, मानसिक स्थिरता अशा अनेक गोष्टी या मर्दानी खेळांच्या माध्यमातून शिकायला मिळत असतात. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात 50 ते 60 च्यावर जुने-नवे मर्दानी खेळांचे आखाडे आहेत. दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी अशा अनेक कला या आखाड्यांमध्ये शिकवल्या जातात. आता तर पुरुषांबरोबर तितक्याच कुशलतेने महिला आणि मुली देखील या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात अग्रेसर आहेत. पारंपरिक वेशभूषेत मर्दानी खेळ सादर करताना असे वाटते की, जणू काही लढवयैच त्यांच्या अंगी अवतरले आहेत.
शिवकालीन युद्धकलेत काय शिकवलं जातं? शिवगर्जना प्रतिष्ठान जोपासतंय प्राचीन वारसा, Video
पूर्वीप्रमाणे कोल्हापुरात नाहीत परिपूर्ण वस्ताद
कुस्ती, मल्लखांब, वेगवेगळे शस्त्रे फिरवणे अशा कित्येक गोष्टी ज्या वीरांना आवश्यक असतात, त्या मर्दानी खेळांमध्ये शिकवल्या जातात. ही कला व्यायाम आणि शौर्यशाली परंपरा सांगणाऱ्या वीरांना घडवणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची कला आहे. ज्यावेळी ब्रिटिशांचे राज्य होते, तेव्हा ही मर्दानी खेळाची परंपरा तरुणांमध्ये रुजवणे आवश्यक होते. त्यामुळेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात वेगवेगळ्या तालमी घडवल्या. याच तालमीमध्ये कुस्तीबरोबर इतर मर्दानी खेळ आणि इतर कला शिकवल्या जायच्या. याच तालमींतून आता विविध आखाडे आणि प्रशिक्षण वर्ग निर्माण झाले आहे. या प्रशिक्षण वर्गातूनच पूर्वीच्या बाजाप्रमाणे नसले तरी योग्यरित्या ही कला शिकवली जाते. मात्र पूर्वीप्रमाणे परिपूर्ण अशा वस्ताद निर्माण होण्याची गरज आहे. तरच सक्षम मर्दानी कला शिकणारे खेळाडू तयार होतील, असे मत इतिहास अभ्यासक राम यादव यांनी मांडले केले आहे.
मर्दानी खेळातील कला झाली नाहीशी
मुळात मर्दानी खेळ आणि कला या दोन्ही गोष्टी म्हंटल्या जाऊ शकतात. यातील कला लुप्त झाली असून फक्त खेळ स्वरूपातच मर्दानी खेळ शिल्लक राहिला आहे. कारण पूर्वी प्रत्येक आखाड्याचे एक वेगळे वैशिष्ट्य असायचे. प्रत्येक वस्तादांचे शिकवणीचे वेगळेपण असायचे. व्यक्तीच्या मर्दानी खेळ खेळण्यावरून त्याच्या वस्तादांची ओळख व्हायची. असे वेगळेपण प्रत्येक आखाड्याचे दिसून येत असल्यामुळे ही कला म्हणूनच मर्दानी खेळ जिवंत होती, असे जाणकार सांगतात.
Shiv Jayanti : बाप-लेकींनी जपलाय शाहिरी परंपरेचा वारसा; शाहिरीतून जिकंतायत प्रेक्षकांची मने Video
आताचे मर्दानी खेळ खेळणारे खेळाडू अर्धवट ज्ञानाने बाहेर पडलेले खेळाडू आहेत, सर्वस्वी ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही, असेच म्हणता येईल. आता आधुनिकतेची माध्यमे जी सर्वत्र पोहोचली आहेत, त्यामुळे हा फरक पडत गेला आहे. पूर्वी कलेवर प्रेम करणारे लोक होते. मात्र सध्या कलेवर कमी आणि स्वतःवरच जास्त प्रेम करणारे असल्यामुळे यापुढे देखील मर्दानी खेळ हा खेळ स्वरूपातच शिल्लक राहील, असे ठाम मत इतिहास संशोधक आणि मर्दानी खेळांचे जाणकार विनय चोपदार यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, पूर्वीप्रमाणे युद्ध कला म्हणून नाही तर एक कला म्हणून हे मर्दानी खेळ व्यवस्थितरित्या जपल्या आणि जोपासले जावेत. हेच प्रशिक्षण संस्थांचे परम कर्तव्य असावे, असेच मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.