कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात बागबगीच्यांमधून तसेच विविध अधिविभाग, हॉस्टेल्स आणि कॅन्टीनच्या माध्यमातून दररोज मोठ्या प्रमाणावर घनकचरा जमा होत असतो. त्यामुळे विद्यापीठ परिसरातच त्याच्यावर प्रक्रिया करण्याची गरज भासू लागली. याच समस्येवर विद्यापिठातील कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमांतून उपाय शोधण्यात आला. कुलगुरू डी.टी. शिर्के यांच्या संकल्पनेतून आता विद्यापीठ परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे.
advertisement
बाबा सोडून गेले, आईनं मोठं केलं आज लेकीने राष्ट्रपती सुवर्णपदक मिळवलं, साईसिमरनची गोष्ट
कसे केले आहे नियोजन?
कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राकडे या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. आर. जी. पवार यांनी या प्रकल्पासाठी एक समिती नेमली आहे. त्यामध्ये विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. असावरी जाधव, उद्यान अधीक्षक अभिजित जाधव, स्वच्छता निरीक्षक शशिकांत साळुंखे हे सदस्य म्हणून वेळोवेळी काम पाहत आहेत. तसेच माजी जिल्हा कृषी अधिकारी लतीफ शेख यांनी या संदर्भात तज्ञ मार्गदर्शन देखील केले आहे.
विद्यापीठातील गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प हा बऱ्याच कालावधीपासून बंद अवस्थेत होता. मात्र कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या चार महिन्यापासून हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आला आहे. तर या चार महिन्यात जवळपास 25 ते 30 किलो गांडूळ खताची निर्मिती आता झालेली आहे. सध्या या ठिकाणी गांडूळ खतनिर्मितीसाठी असणाऱ्या फक्त आठ बेडची संख्या वाढवणे किंवा ज्या ठिकाणी घनकचरा निर्माण होतो. त्याच ठिकाणी अशा गांडुळ खतनिर्मितीचे बेड उभारण्याचा भविष्यातील मानस असल्याचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. आर. जी. पवार यांनी सांगितले आहे.
करिअरला मिळेल नवा आयाम; कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शिका आता पोर्तुगीज भाषा
कशा प्रकारे होते गांडूळखत निर्मिती?
शिवाजी विद्यापीठात वसतिगृह, कॅन्टीन या ठिकाणी खराब झालेला भाजीपाला, झाडांचा रोज निर्माण होणारा पालापाचोळा असा घनकचरा जमा होत असतो. झाडांचा पालपाचोळा हा पूर्वी जाळून नष्ट केला जायचा. पण आता हे सर्व एकत्रित करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून हे गांडूळखत निर्माण केले जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या बेडमध्ये थोड्या थोड्या दिवसांनी गांडूळ सोडले जातात. यामुळे विद्यापीठ परिसरातील कचऱ्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट होत आहे, असे उद्यान अधीक्षक अभिजित जाधव यांनी सांगितले आहे.





