कोल्हापूर : कोल्हापूरचा स्वप्निल कुसाळे हा ऑलम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत असल्यामुळेच अख्या कोल्हापूरसह देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष पॅरिस ऑलिम्पिककडे लागले होते. त्याने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशवासियांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करुन दाखवली आहे. 50 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारल्यानंतर स्वप्निल आता कांस्यपदकाची कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. एका ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता फेरीतूनच माघार घ्यावी लागलेल्या स्वप्नीलने आता देशासाठी कांस्यपदक मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे अवघ्या कोल्हापूरसह देशाची मान उंचावली गेली आहे.
advertisement
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील कुसाळे परिवारात 6 ऑगस्ट 1995 रोजी स्वप्नीलचा जन्म झाला होता. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असणाऱ्या स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे आणि गावच्या सरपंच असलेल्या आई अनिता कुसाळे यांनी स्वप्निलला लहानपणापासूनच नेहमी प्रोत्साहन दिले आहे. तसेच स्वप्निलचा लहान भाऊ सूरज कुसाळे हा एक क्रीडा शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे.
घरातील सर्वांच्या आशीर्वादामुळेच आणि प्रोत्साहनामुळे स्वप्निल त्याच्या क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी करत गेला आणि त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या या मराठमोळ्या नेमबाजाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर रायफल क्रिडा प्रकारात 3 पोझिशनमध्ये तब्बल 451.4 गुणांसह ऐतिहासिक विजय मिळवत कास्यपदकावर नाव कोरले आहे. स्वप्निलचा अंतिम सामना पाहण्यासाठी गावातील सर्व मित्र परिवार एकत्र स्वप्नीलच्या घरी जमला होता. पदकाची कमाई केल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. स्वप्निल भारतात परत आल्यानंतर त्याची कोल्हापूरपासून अगदी गावापर्यंत जंगी मिरवणूकही काढणार असल्याचे स्वप्निलच्या वडिलांनी सांगितले.
nashik one day trip : नाशिकमध्ये एका दिवसात पाहता येतील ही 5 ऐतिहासिक मंदिरे
कशी झाली स्पर्धा -
एकूण 8 स्पर्धकांसह झालेला 50 मीटर रायफल शूटिंगचा अंतिम सामना हा अत्यंत अटीतटीचा राहिला. 40 शॉट्समध्ये शेवटपर्यंत सर्वात कमी गुण असणारे स्पर्धक यामधून बाहेर होत गेले. यामध्ये 3 पोझिशन नेमबाजीत निलिंग म्हणजेच गुडघ्यावर बसून नेमबाजी करताना स्वप्निल तीन मालिका पूर्ण झाल्यानंतर 153.3 गुण मिळवून सहाव्या स्थानावर राहिला. पुढे प्रोन अर्थात झोपून नेमबाजी करताना स्वप्नील 310.1 गुणांसह पाचव्या स्थानावर आला. तर पुढे स्टॅंडिंग अर्थात उभे राहून नेमबाजी करताना स्वप्निल तिसऱ्या स्थानापर्यंत आला. तर अखेरच्या राऊंडमध्ये चमकदार कामगिरीसह युक्रेनच्या स्पर्धकाने प्रथम आणि चीनच्या स्पर्धकाने द्वितीय स्थानावर आपली जागा कायम ठेवली. त्यामुळे युक्रेनच्या खेळाडूने सुवर्ण, चीनच्या खेळाडूने रौप्य आणि स्वप्निल कुसाळेने कास्यपदकाला गवसणी घातली आहे.
असा बनला स्वप्नील उत्तम नेमबाजपटू -
क्रीडा विषयक प्रशिक्षण घेत असताना पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातून सांगली येथे प्रशिक्षण केंद्र मिळाल्याने सांगलीमध्येच स्वप्नीलने शिक्षण घेत आपले भविष्य घडवायला सुरुवात केली होती. फक्त 15-16 वर्षांचा असताना नववीत शिक्षण घेणाऱ्या स्वप्नीलने नाशिक येथे जाऊन नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले होते. शिकत असताना स्वप्निलचे मन मात्र ऑलिम्पिककडेच असायचे. यातच 2008 साली अभिनव बिंद्राचा ऑलिम्पिकचा खेळ पाहण्यासाठी बारावीच्या परीक्षेलाही दुर्लक्षित केले होते. तर योग्य प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर अनेक शालेय स्तरावरील स्पर्धांपासून ते राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये स्वप्निलने अनेक पदके मिळवली होती. हाच त्याचा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी 2009 साली स्वप्निलचा प्रवेश महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत झाला. पुढे 2015 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील एका स्पर्धेत रौप्य पदक मिळवून राष्ट्रीय पातळीवर स्वप्निल चर्चेत येऊ लागला. कुवेतमधील एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदकाचा देखील तो मानकरी ठरला. त्यामुळे त्याला भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून नोकरी मिळाली.
ठाण्यात एकाच ठिकाणी मिळते 10 पेक्षा अधिक प्रकारची पावभाजी, खवय्यांची होते मोठी गर्दी, लोकेशन काय?
अशी मारली अंतिम फेरीपर्यंत धडक -
टीसी म्हणून कार्यरत असतानाच 2018 साली राष्ट्रकुल स्पर्धेत स्वप्निलने कांस्यपदक मिळवले. पुढे 2020 टोकियो ऑलम्पिक स्पर्धांच्या पात्रता फेरीत अवघ्या 0.03 गुणाने त्याची संधी हुकली होती. मात्र, खचून न जाता स्वप्नीलने पुन्हा नव्या जोशात तयारी करून आता 2024 च्या पॅरिस ऑलम्पिकमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. यासाठी गेल्या 10 वर्षांपासून स्वप्निलकडून प्रशिक्षक म्हणून योग्य आणि कसून सराव करून घेतल्याचा फायदा होत आहे, असे प्रशिक्षिका दिपाली देशपांडे सांगतात. तर सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नीलने सुरुवातीपासूनच चांगले प्रदर्शन करत गुणांमध्येही गुणांमध्येही सातत्य ठेवले होते. 50 मीटर एअर रायफल गेममध्ये अंतिम सामन्यात धडक मारताना स्वप्निलने पात्रता स्पर्धेत थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये सातव्या स्थानावर राहून 590 गुणांची कमाई केली होती.
खाशाबा जाधव यांच्या नंतर ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणारा स्वप्निल हा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला. त्यामुळे महाराष्ट्रसह देशाची मान उंचावली गेली आहे. तर ऑलम्पिकमध्ये पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्निलच्या घरासह गावकऱ्यांनी देखील मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला आहे.
एकदा ऑलिम्पिकच्याच दारातून परत येताना हार न मानता पुन्हा नव्याने तयार होऊन स्वप्निलने नव्या जोशाने अतुलनीय कामगिरी केली आहे. तर ऑलम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या स्वप्निलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.