काय आहे प्रकरण?
40 वर्ष शिवसेनेचा कार्यकर्ता, समाजकार्य करताना कोणताही धर्म आडवा आला नाही. मात्र, ऐतिहासिक विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात झालेल्या हिंसाचारात त्यांचं राहतं घर डोळ्यासमोर उध्वस्त होताना पाहून त्यांना खूप वेदना झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आजपर्यंत काम करत आलो. मात्र, जमावाने माझ्याकडे असलेलं शिवसेनेचे ओळखपत्र पाहून मला जिवंत सोडलं अशा भावना 55 वर्षीय हसन गोलंदाज यांनी व्यक्त केल्या. मोठ्या कष्टाने उभारलेलं घर जमावाच्या हल्ल्यात उध्वस्त होताना पाहून गोलंदाज यांना अश्रू अनावर झाले. विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला लागलेल्या हिंसक वळणात गोलंदाज यांच्या घरावरील कौले, पत्रे आणि प्रापंचिक साहित्य उध्वस्त करण्यात आलं आहे. विशाळगडाला जाताना असलेल्या आशीर्वाद की दुवा ही पान टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या गोलंदाज यांचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
वाचा - विधानपरिषदेत जयंत पाटील पराभूत का झाले? शरद पवार पहिल्यांदाच बोलले
खासदार शाहू महाराजांकडून पीडितांना दिलासा
किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी रविवारी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला होता. मात्र या मोहिमेला हिंसक वळण लागलं. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील अनेक घरांना जमावने लक्ष्य केलं. येथील प्रार्थनास्थळासह दुकानांची नासधूस केली. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी पीडितांना आधार देत त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.