मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून कोटला गावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने दुर्गा माता मार्च काढला जातो. परंपरेनुसार, आज सकाळी देखील अशाच प्रकारे मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र यावेळी मिरवणुकीतील काही समाजकंठकांनी केलेल्या समाजाविरोधात कृतीमुळे एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित समाज आक्रमक झाला आणि त्यांनी कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं.
advertisement
दरम्यान, आक्रमक झालेल्या गटाने कोटला गावात एकत्र येत रास्ता रोको केला. मागील काही तासांपासून हा रास्ता रोको आंदोलन केलं जात होतं. यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्यास सांगितलं. पण आंदोलक जागेवरून हलले नाहीत. यानंतर पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य प्रकारचा लाठीचार्ज केला. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर देखील प्रतिहल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
दुर्गा मातेच्या मिरवणुकीत एका संशयिताने रस्त्यावर एका धर्मगुरुंचं नाव लिहून विटंबना केली होती. यानंतर हा तणाव वाढल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतलं. तरीही आंदोलक रास्ता रोको करत असल्याने हा लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती आहे.