अनमोल केवटे असं हत्या झालेल्या ३७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो दक्षिण सोलापूरच्या मंद्रूप येथील रहिवासी होता. तर सोनाली सुखदेव भोसले असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल आणि सोनाली दोघंही भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्ताने लातूरला आले होते. हे दोघेही कारने सोलापूरकडे परतत असताना त्यांच्यावर खूनी हल्ला झाला.
advertisement
दोघंही कारने जाताना मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास समोरून आलेल्या क्रुझरने कट मारल्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. क्रुझरमधील चौघांनी धारदार शस्त्रांनी अनमोल व मैत्रिणीला भोसकले. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना काहीजणांनी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच अनमोलचा मृत्यू झाला. सोबतच्या जखमी सोनाली सुखदेव भोसले (२७) यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास खाडगाव स्मशानभूमीनजीक घडली. दरम्यान, पोलिसांच्या तपासात आरोपी रेणापूर तालुक्यातील असल्याचे उघड झाले असून या प्रकरणात एकाला अटक केली आहे.
मृताची पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती. त्यास तडीपार केले होते. त्याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून अनमोल केवटे आणि त्याची मैत्रीण सोनाली भोसले हे दोघे बुधवारी (१७ सप्टेंबर) दुपारी ३ वाजेच्या सुमारास सोलापूर येथून लातूरला आले होते. लातूरमधील कार्यक्रम पार पाडून दोघंही सोलापूरच्या दिशेनं जात होते, तेव्हा हा भयावह हल्ला घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जीप आडवी लावून वाद सुरू केला. यावेळी अनमोल केवटे आणि त्याची मैत्रिण सोनाली भोसले हे दोघे खाली उतरले. यावेळी हल्लेखोरांनी जवळील धारदार चाकूने आधी अनमोलच्या मानेवर आणि गळ्यावर वार करण्यात आले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच त्याच्या मैत्रिणीच्या छातीत ३ आणि पाठीत दोन ठिकाणी चाकूने भोसकण्यात आले. दोघेही जमिनीवर कोसळताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे