दादाराव चन्नाप्पा मंजुळे असं हत्या झालेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. दादाराव यांना दारूचे व्यसन होते आणि ते नेहमीच पत्नी वत्सलाबाई (वय ६०) यांना मारहाण करत असत. १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी दादाराव यांनी पुन्हा एकदा दारुच्या नशेत पत्नीला निर्दयीपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून त्यांचा मुलगा जीवन (वय ३६) आणि सजीव (वय ३२) यांचा राग अनावर झाला.
advertisement
त्यांनी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती चिघळली. रागाच्या भरात दोन्ही मुलांनी कुऱ्हाडीचा दांडा आणि लाकडाने वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात डोक्यावर आणि हातावर गंभीर मार लागल्याने दादाराव यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर घाबरलेल्या पत्नी आणि मुलांनी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचून अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, औराद शहाजाणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आणि हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी बीट अंमलदार गौतम भोळे यांच्या फिर्यादीवरून पत्नी वत्सलाबाई, तसेच त्यांची मुलं जीवन आणि सजीव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.