मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरासह आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. आसपासच्या भागात नरभक्षक बिबट्याकडून अनेकांवर हल्ले केले जात आहेत. आता पुन्हा एकदा एका बिबट्याने पाच वर्षांच्या मुलीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत मुलीला उचलून नेलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.
advertisement
ही घटना अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने इथं घडली आहे. रियांका सुनील पवार असं बिबट्याने हल्ला केलेल्या मुलीचं नाव आहे. घटनेच्या दिवशी बुधवारी (१२ नोव्हेंबर) सायंकाळी ती आपल्या घरासमोर शेकोटीजवळ खेळत होती. यावेळी तिची आई देखील बाहेरच होती. दरम्यान, घराजवळील तुरीच्या शेतातून आलेल्या बिबट्याने अचानक रियांकावर हल्ला केला आणि तिला उचलून नेलं. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला मात्र तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, खारेकर्जुने येथील शेतावर काही कुटुंबे मजूर म्हणून वास्तव्यास आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता थंडी वाढल्याने कुटुंबातील सदस्य शेकोटीजवळ बसले असताना रियांका जवळच खेळत होती. त्याच वेळी शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि क्षणार्धात तिला उचलून घेऊन गेला. कुटुंबीयांनी आरडाओरड केली व पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही साध्य झाले नाही.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने वस्तीवर धाव घेतली व शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, पोलिस आणि वन विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल होऊन रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. पण चिमुकलीचा अद्याप शोध लागला नाही. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा बसवण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी रात्रीची दक्षता घ्यावी. लहान मुलांना एकटं सोडू नये आणि वनविभागाशी त्वरित संपर्क साधावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
