रस्त्यावरची दहशत कमी होणार, राज्यात हे पहिल्यांदाच घडणार, पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्लॅन ठरला
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune News: पुण्यात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे: पुण्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. या कुत्र्यांना रेबीजमुक्त करण्यासाठी आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आता महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून कुत्र्यांना मायक्रोचिप बसविण्यात येणार आहेत. राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून, याची सुरुवात या महिन्यापासून होत आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.
पुण्यातील भटक्या कुत्र्यांची गणना महापालिकेने मे 2023 मध्ये केली होती. त्यावेळी शहरात 1 लाख 79 हजार 940 कुत्रे आढळले होते. त्याआधी 2018 मध्ये ही संख्या 3 लाख 15 हजार होती. त्यात पाच वर्षांत मोठी घट झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर महापालिकेत 34 गावे समाविष्ट झाल्याने या गावांतील भटक्या कुत्र्यांची त्यात भर पडली. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची एकूण संख्या सुमारे अडीच लाखांवर पोहोचली आहे.
advertisement
भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सातत्याने राबविली जात आहे. याचबरोबर कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसही दिली जात आहे. आता पशुवैद्यकीय विभागाने शहरातील कुत्र्यांना मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
याबाबत महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे म्हणाल्या की, राज्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग करण्यात येत आहे. एका खासगी कंपनीकडून या चिप मोफत मिळाल्या आहेत. या चिप कुत्र्यांच्या खांद्याच्या भागात इंजेक्शनद्वारे टोचल्या जाणार आहेत. या चिपमध्ये आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या मायक्रोचिपला 15 अंकी क्रमांक असेल आणि तो कुत्र्याला मिळेल.
advertisement
दरम्यान, कर्मचारी स्कॅनरच्या साहाय्याने कुत्र्याचा खांदा स्कॅन करतील. तसेच या क्रमांकाच्या आधारे त्याची सर्व माहिती मिळवतील. सुरुवातीच्या टप्प्यात सहाशे कुत्र्यांना मायक्रोचिप लावण्याचे नियोजन करण्यात आले असून, याची सुरुवात या महिन्यापासून होत आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये या प्रयोगाचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2025 1:00 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
रस्त्यावरची दहशत कमी होणार, राज्यात हे पहिल्यांदाच घडणार, पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी प्लॅन ठरला

