प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं...या धोरणानुसार भाजपनं आगामी निवडणुकांच्या संग्रामाची तयारी सुरु केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली असून महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठका सुरु असून त्यात हे आदेश देण्यात आले आहेत.
जोरदार इनकमिंगची शक्यता
advertisement
भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल, त्यांना पक्षात घ्या. भाजपमध्ये घेताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घ्या. भाजपच्या या आदेशानंतर वसई विरार, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग भाजपमध्ये जोरदार इनकमिंगची शक्यता वर्तवली जात आहे.
काळजी घेण्याचे आदेश
एकीकडे मविआच्या नेत्यांचं वेलकम होत असताना दुसरीकडे जिथे शक्य नाही तिथे युती होणार नाही असंही भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भाजपकडून युतीचे सर्व अधिकार जिल्ह्यांना देण्यात आलेत.जिथे जिथे युती शक्य आहे तिथे युती करावी, समजा एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी टोकाची टीका करु नये असे आदेश देण्यात आले आहेत. मैत्रीत कुठेही कटुता येऊ नये याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रणनीती आखली
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा मानल्या जात आहे.विशेषतः महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यामधून होणाऱ्या निवडणुका केवळ स्थानिक मुद्द्यांपुरता मर्यादित राहत नाहीत.तर त्या आगामी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या राजकीय समीकरणांवरही परिणाम घडवू शकतात.भाजपला हे चांगलंच माहितीये आणि त्यानुसारच त्यांनी आपली रणनीती आखली आहे.