या रो-रो प्रकल्पाचे काम तांत्रिक अडचणींमुळे वारंवार थांबत होते. कधी कामाचे टेंडर, कधी हवामान, तर कधी तांत्रिक मोजमापांमुळे कामाला उशीर होत होता. त्यामुळे 2018 पासून सुरू असलेला हा प्रकल्प कासवाच्या गतीने पुढे सरकत होता. मात्र मागील चार-पाच महिन्यांपासून कामात चांगला वेग दिसू लागला आहे. सध्या एकूण प्रकल्पापैकी 50 टक्के काम पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
या मार्गावरील रेवस जेट्टीचे बांधकाम ही सर्वात मोठी अडचण ठरत आहे. सुरुवातीच्या अंदाजापेक्षा खर्च वाढल्याने या कामावर अतिरिक्त पाच कोटी रुपयांचा भार पडला आहे. जेट्टीची रचना, खोली वाढवणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बदल करणे या कामांमुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढले आहेत. त्यामुळे जेट्टी पूर्ण होण्यासाठी अजून काही महिने लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोरा–भाऊचा धक्का या जलमार्गावर रो-रो सेवा सुरू झाल्यास उरण, रायगड परिसरातील प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. मुंबईपर्यंतचा प्रवास कमी वेळात, सुरक्षितपणे आणि कमी खर्चात करता येईल. मात्र सेवा प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी अजून किती वेळ लागणार? हा प्रश्न अद्याप माहिती नाही.
