वाळवा तालुक्यात शिरगाव हे गाव आहे. या गावात सिद्धेश्वराचं प्राचीन देवस्थान आहे. या देवस्थानात गेल्या 97 वर्षांपासून 'अखंड हरीनाम पारायण सोहळा' आयोजित केला जातो. सात दिवसांच्या या पारायण सोहळ्याची सांगता महाप्रसादाने होते. महाप्रसादासाठी लोकवर्गणीतून साहित्य खरेदी केलं जातं. शिल्लक राहिलेल्या साहित्याचा लिलाव करण्याची प्रथा या गावात आहे. या लिलावाची पंचक्रोशीत चर्चा होते.
advertisement
यंदा महाप्रसादातून 23 वस्तू शिल्लक राहिल्या होत्या. यंदाच्या लिलावात प्रत्येक वस्तूचा दर शंभर रुपये निश्चित करण्यात आला होता. भक्तांनी मात्र, मोठ्या उत्साहात मोठ्या किमतीची बोली लावली. या लिलावात उत्तम चौगुले यांनी कोथिंबीरीची जुडी 20 हजार रुपयांना खरेदी केली. सुरेश आंबी यांनी 12 हजार रुपये देऊन गहू खरेदी केले, तांदळासाठी शिवाजी हवालदार यांनी 13 हजार, हरभरा डाळीसाठी अविनाश शिंदे यांनी साडेनऊ हजार आणि चटणीसाठी (मिरची) संपत पाटील यांनी 17 हजार रुपये मोजले. मंदिरातील पडदे मिळवण्यासाठी विक्रम पाटील यांनी 1700 रुपयांची सर्वाधिक बोली लावली.
मानाचा नारळ खरेदीसाठी सर्वात जास्त चढाओढ लागते. यावर्षी गजानन पाटील यांनी बाजी मारत तब्बल 41 हजार रुपयांची बोली लावून मानाचा नारळ खरेदी केला. या लिलावातून मंदिर समितीला 1,75000 लाख रुपये मिळाल्याचं सांगितलं जात आहे. हा लिलाव मोठ्या उत्साहात पार पडला. लिलावात खरेदासाठी चढाओढ असली तरी त्यामागेही श्रद्धा असते, असं ग्रामस्थ उमेश माळी यांनी सांगितलं.
गावासाठी हरिनामाचा गजर
गावात पाऊस-पाणी चांगला राहावा, धनधान्य जोमाने पिकावे यासाठी गावकरी दरवर्षी पारायण सोहळ्यात हरीनामाचा गजर करतात. संपूर्ण गावातील स्त्री, पुरुष, अबाल-वृद्ध या हरीनाम सप्ताहात सहभागी होतात. सात दिवस काकड आरती, हरीपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन अशा उपक्रमांमधून गावकरी एकत्र येतात. पारायणाच्या शेवटच्या दिवशी पुरणपोळ्यांच्या महाप्रसादाने सांगता होते. याच महाप्रसादातून शिल्लक राहिलेल्या वस्तू लिलावात विकण्याची प्रथा आहे.