सावंत यांनी उमेदवारी का नाकारली?
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे आपल्या अभ्यासू, मुद्देसूद मांडणीने पक्षाची बाजू मांडतात. सचिन सावंत यांना काँग्रेसने अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली. मात्र, सावंत यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली आहे. सचिन सावंत यांनी म्हटले की, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असे सावंत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
advertisement
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वांद्रे पूर्व ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे. ठाकरे गटाने या जागेवर वरूण सरदेसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर, अंधेरी पश्चिममध्ये सध्या भाजपचे अमित साटम हे विद्यमान आमदार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीचे रविंद्र वायकर आणि मविआचे अमोल किर्तीकर यांच्यातील मतांचे अंतर अतिशय कमी होते. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे.
