मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा यासाठी राज ठाकरे यांनीदेखील चर्चा केली आहे. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा असे भाजपचे मत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दादर माहिममध्ये अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा देण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
advertisement
आमदार सरवणकर उमेदवारी मागे घेणार?
दादर-माहीम मतदारसंघातून सध्या विद्यमान आमदार सदा सरवणकर आहेत. सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत. सरवणकर यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी आणि अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा, असे भाजपमधील काही नेते आणि शिंदे गटातील काही नेत्यांनी मत व्यक्त केले. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ.
मुख्यमंत्रीही सकारात्मक....
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक दिसून आले. त्यांचीदेखील मान्यता होती. परंतू, आपण उमेदवार न दिल्यास आपली मते ही शिवसेना ठाकरेंकडे जातील असे मत शिवसेनेतून व्यक्त करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
