पवारांनी दिला बीडकरांना शब्द...
शरद पवार यांनी बीडमध्ये पक्षाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. सत्तेसाठी जवळचे सोडून गेले मात्र तत्वाशी तडजोड ना करता एकनिष्ठ राहिलेल्या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना विधानसभेत पाठवा. संदीप यांना मी त्यांच्यावर आगामी सत्तेत मोठी जबाबदारी देण्याचा शब्द देतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संदीप क्षीरसागर यांच्या मंत्रिपदाचे बीडकरांना आश्वासन दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारर्थ बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरील जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
advertisement
माझी साथ दिल्याने संदीप क्षीरसागरांना साथ...
यावेळी बोलताना पवार यांनी दिवंगत नेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पवारांनी म्हटले की, काकूंनी घालून दिलेल्या आदर्शवर चालण्याचं काम संदीप यांनी केलं आहे. दोन वर्षांपूर्वी पक्षात फाटफूट झाली, माझ्या घरच्या लोकांनी मला सोडलं. पक्ष फोडला मात्र बीड जिल्ह्यातून संदीपभैय्या या एकमेव तरुणाने तत्वाशी तडजोड ना करता माझी साथ दिली. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. अनेक योजना अडवल्या गेल्या. परंतु काळजी करू नका, येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, या सरकारमध्ये संदीप भैय्याला सरकारमध्ये मोठी जबाबदारी देऊन तुमच्या सेवेची संधी दिली जाईल. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सत्तेत सहभागी करून घेतले जाईल असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
