मोदींच्या सभेला खुर्च्याच...पण माणसं नाहीत...
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाची धार आणखीच तीव्र झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईतील सभेवरही टीका केली. उद्धव यांनी म्हटले की, काल मुंबईमध्ये खुर्चीची गर्दी झाली होती. पण माणसे आलीच नाहीत. सिल्लोडची हुकूमशाही आपण सगळेजण गाडायला आले आहात. अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई यांना शिविगाळ केली, अपशब्द वापरले. तेच सत्तार हे मुंबईत काल मोदींच्या सभेत बसला होते. तुमची हीच संस्कृती आहे का असा सवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला केला. आमच्या हिंदुत्वाची भीती नाही म्हणून मुस्लिम महिला इथे बिनधास्त आल्याचे उद्धव यांनी सांगितले.
advertisement
भाजप कार्यकर्त्यांना आवाहन...
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात, भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यांनी म्हटले की, सिल्लोडमधील भाजपला मी आवाहन करतो. आपले मतभेद असतील ...पण तुम्ही मला बोलायला आलात तर मी तुमच्याशी बोलेन. पण अब्दुल सत्तार याची दादागिरी गुंडगिरी गाडण्यासाठी एकत्र या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
शेतकऱ्यांना हमी भाव देणार...
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, गद्दारांना 50 खोके मिळाले मग शेतकऱ्यांना हमी भाव का नाही. आपल्या सरकारच्या काळात सोयाबीनला चांगला दर होता. आता पुन्हा आपलं सरकार आल्यावर सोयाबीनला 7000 रुपयांचा भाव देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकरी मुले फिस भरू शकत नाही. त्यामुळे मुलीसारखे मुलांना मोफत शिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तारांना तुरुंगात टाकणार
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अब्दुल सत्तार यांच्यावर असलेल्या आरोपांची यादी वाचून दाखवली. ठाकरे यांनी म्हटले की, गद्दारांनी अनेकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. शहरात सुद्धा अनेक ठिकाणी मालमत्तांचा ताबा मिळवला आहे. गद्दार गद्दार एकत्र आले. त्यातील दोघांना मी मंत्रिपदे दिली. पण हे नुसते खात सुटले. आपलं महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार असून तुरुंगात डांबणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
