आतापर्यंत काँग्रेसने 99 उमेदवार जाहीर केले आहेत. तर, शिवसेना ठाकरे गटाने आपल्या 84 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. यावरून आता संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर देताना प्रेमाचा सल्ला दिला आहे.
advertisement
वाद काय?
दक्षिण सोलापूर येथून शिवसेना ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील यांना 24 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्मही दिला. तर, काँग्रेसने 27 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. या यादीत दक्षिण सोलापूरमधून दिलीप माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, “आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत. सोलापूर दक्षिण या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या यादीतही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात.” असे राऊत यांनी म्हटले. नागपूरमध्ये ठाकरे गटाला एकच सोडण्यात आली, त्यावर राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.
नाना पटोलेंनी काय म्हटले?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, संजय राऊत यांनी आता हा विषय संपवायला हवा. कोकणातही काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. आपल्याला एकत्र होऊन सत्ताधाऱ्यांशी लढायचं आहे. संजय राऊत यांनी आता आपल्या विरोधकांवर बोलले पाहिजे, असा प्रेमाचा सल्ला देत असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. राऊतांच्या टायपिंग मिस्टेकबाबत आपण बोलणार नसून हायकमांडच्या निर्णयावर त्या पातळीवर चर्चा होईल असे त्यांनी म्हटले.
