शिवडी मतदारसंघात लालबाग-परळ- शिवडी हा गिरणगावचा भाग येतो. या ठिकाणी मराठी भाषिकांचे प्रमाण अधिक आहे. शिवसेना स्थापन झाल्यानंतरच्या काही वर्षात 1970 च्या सुमारास लालबाग-परळचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या झाली. या हत्येचा आरोप शिवसैनिकांवर होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून वामनराव महाडिक विजयी झाले. त्यानंतर शिवसेनेने या भागात आपले वर्चस्व निर्माण केले. हा सगळा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळेच माहिम इतकंच महत्त्व या शिवडी मतदारसंघाला आहे.
advertisement
यंदाच्या विधानसभा निवडणूक ठाकरे गटासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आणि स्थानिक शिवसैनिक सुधीर साळवी यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. सुधीर साळवी यांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जाते होते. पण, त्यांच्या ऐवजी पुन्हा अजय चौधरी यांना संधी मिळाली. साळवी यांना उमेदवारी न मिळाल्याने साळवी समर्थकांनी गुरुवारी रात्री शिवसेनेच्या लालबाग शाखेसमोर घोषणाबाजी केली.
>> सुधीर साळवींपेक्षा अजय चौधरींना उमेदवारी का?
सुधीर साळवी यांच्यापेक्षा अजय चौधरी यांच्या नावाला उद्धव ठाकरेंनी का पसंती दिली, या कारणाची चर्चा सुरू झाली आहे.
- शिवसेनेत फूट पडल्यानंतर अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. अजय चौधरी हे या भागातील जुन्या शिवसैनिकांपैकी एक आहेत. शिवसेनेने दगडूदादा सपकाळ यांच्या आमदारकी नंतर अजय चौधरींना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले.
- अजय चौधरी यांची परळ, शिवडी, लालबाग-काळाचौकी या भागात काम असून त्यांचा संपर्क ही आहे. सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. साळवी यांचे प्राबल्य लालबाग-काळाचौकी भागात आहे.
- या मतदारसंघात मनसेकडून बाळा नांदगावकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. परंतु पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या भाजपात असलेले नाना आंबोले यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते.
- सुधीर साळवी यांना उमेदवारी दिली असती तर, नाना आंबोले यांनी परळ आणि लगतच्या भागातून अधिक मते खेचली असती आणि लालबाग परिसरात साळवी आणि नांदगावकर यांच्यात मतविभागणी झाली असती. याचा फायदा महायुतीला झाला असता.
- अजय चौधरी यांना उमेदवारी दिल्याने परळमधील मते ठाकरे गटाकडे वळू शकतात. नाना आंबोले यांच्याकडे जाणारी मते शिवसेना ठाकरे गट आपल्याकडे वळवू शकतो.
- अजय चौधरी हे जुने शिवसैनिक असल्याने यंदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत जुने शिवसैनिकही मोठ्या प्रमाणावर सक्रिय होऊ शकतात. माजी आमदार दगडूदादा सपकाळ हे देखील आपली ताकद चौधरींच्या मागे उभी करणार असल्याचे म्हटले जात आहे.
- पक्षफुटीनंतर मंत्री, आमदार यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. पण, पक्षाच्या आव्हानात्मक काळात साथ देणाऱ्या निष्ठावंतांना सोडणार नसल्याचे संदेश ठाकरे यांनी अजय चौधरींच्या उमेदवारीच्या मार्फत दिला असल्याचे सांगण्यात येते.
इतर संबंधित बातमी:
