परळी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना हा संघर्ष अधिक पेटला आहे. त्यामुळे परळीत वातावरण पेटलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने परळी मतदारसंघात स्वतः लक्ष घालून बूथ एजंट वर निर्बंध घालावे, मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरा छेडछाड करून बोगस मतदानाला रोख लावून मतदानाची वेब कास्टिंग करावी अशी मागणी राजसाहेब देशमुख यांनी केली आहे.
advertisement
देशमुख यांनी म्हटले की, मी मॅनेज उमेदवार असेल तर धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाच्या पिंडीवरील बेल उचलावा असे थेट आव्हान देशमुख यांनी दिले. मी मॅनेज नसून त्यांचा लाभार्थी नसल्याचेही त्यांनी म्हटले. धनंजय मुंडे हे निष्क्रिय असून त्यांचे मतदारसंघात कोणतेही काम नाही. तसेच बीड जिल्ह्याचा बिहार होत असून अधिकारी देखील याला पाठबळ देत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार आणि त्यांच्या चुलत बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. मविआ सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती. अजित पवारांनी शरद पवारांविरोधात बंड केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना साथ दिली. आता, परळीमध्ये मुंडे यांच्या पराभवासाठी शरद पवार गटाने कंबर कसली आहे.
