काही दिवसांपूर्वीच महायुतीने आपला जाहीरनामा प्रकाशित केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपला जाहीरनामा जाहीर केला होता. आता भाजपकडून आज, आपला जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. मात्र, त्याआधी भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे समोर आले आहेत.
काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यात?
advertisement
- वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देण्याचे वचन
- सरकार स्थापनेनंतर व्हिजन महाराष्ट्र @2029 हे 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन
- अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार
- 25 लाख रोजगार निर्मिती करणार
- महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये विद्यावेतन देणार
महाविकास आघाडीकडूनही आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार...
विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीनेदेखील आपली पंचसूत्री जाहीर सभेत जाहीर केली होती. यामध्ये राज्यातील महिलांना महिना 3 हजार रुपये देणार, तसेच महिलांना एसटीचा प्रवासही मोफत असणार, बेरोजगार तरुणांना महिन्याला 4 हजार रुपये मिळणार, शेतकऱ्यांची 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली जाणार, 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा आणि औषधे मोफत मिळणार, जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणामध्ये वाढ करण्यासाठी प्राधान्य देणार, अशा घोषणा करण्यात आल्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यामध्ये 5 जीवनावश्यक वस्तूच्या दरांवर नियंत्रण, मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण, महिला पोलीस भरती आदी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
