महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना महाडिक यांनी हे वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह विरोधकांनी महाडिक यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला होता. महाडिक आणि भाजपची मानसिकता या निमित्ताने समोर आली असल्याचे विरोधकांनी म्हटले. आपल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाल्याचे दिसताच, महाडिक यांनी काँग्रेसने विपर्यास केले असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. ‘त्यांचा फोटो काढा बंदोबस्त करू, या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. एवढ्यासाठी सांगितलं की या महिलांना कदाचित त्या योजनेचा लाभ मिळाला नसेल, तर आपण त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू. हे सांगण्याची माझी भूमिका होती, असे महाडिक यांनी म्हटले होते. वक्तव्याचा विपर्यास करण्याचं काम काँग्रेसचं आहे, त्यात चुकीचं काही नाहीये. महायुतीच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि मग दुसऱ्याचं गुणगान गायचं, असं कसं? त्यामुळे या महिलांनी आपल्यासोबत राहिलं पाहिजे. ज्या येत नसतील त्यांना कदाचित लाभ मिळाला नसेल, त्यांनाही लाभ मिळावा, ही माझी भूमिका होती’, असं धनंजय महाडिक म्हणाले. मात्र, आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
advertisement
धनंजय महाडिकांनी निवेदनात काय म्हटले?
सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची माफी मागतो.
माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना, चुकून आलेली प्रतिक्रिया आहे.
मी माझ्या वैयक्तिक , राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नी मार्फत गेली 16 वर्षे भागीरथी महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नेहमीच सकारात्मक काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन.
महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण बाबत, आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. तरीही माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या
माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो.
धनंजय महाडिक यांनी काय म्हटले होते?
काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. ज्या 1500 रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या...म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचे आणि गायचं त्यांचे असं चालणार नाही. काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या, काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या की आमच्याकडे फोटो द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. आम्हाला पैसे नको सुरक्षा हवी, असं म्हणत लय मोठ्याने कोण भाषण करु लागली, किंवा दारात आली तर लगेच फॉर्म देऊन सही घ्यायची आणि पैसे बंद करुन टाकायचे. आमच्याकडे काय पैसे लय झालेले नाहीत, असेही महाडिक यांनी म्हटले.
