भाजपचे दिग्गज नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या पक्षाविरोधात आता बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. गोपाळ शेट्टी हे बोरिवली मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पण, भाजपने या मतदारसंघातून संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
माजी खासदार गोपाळ शेट्टी नाराज...
लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून पुन्हा उमेदवारी नाकारल्यानंतर गोपाळ शेट्टी हे बोरिवलीतून इच्छुक होते. मात्र, त्यांना विधानसभेसाठीदेखील उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली. एका वृत्तपत्रासोबत बोलताना, आपण ही निवडणूक बोरिवलीकरांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार असल्याचे गोपाळ शेट्टी यांनी म्हटले. बोरीवलीतून विद्यमान आमदार सुनील राणे, संजय पांडे हेही इच्छुक होते. भाजप नेतृत्वाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली. शेट्टी यांना तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त घोषणाबाजी केली.
advertisement
आमचा मतदारसंघ धर्मशाळा नाही...
माजी खासदार असलेल्या गोपाळ शेट्टी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, बोरिवली हा आामचा मतदारसंघ धर्मशाळा नाही. संविधानानुसार, एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभेचा मतदारसंघ असतो. कायद्यात कुणी कुठून लढू नये, असे काही म्हटले नाही. परंतु स्थानिक निवडणूक ही स्थानिक मुद्यांवर अधिक लढवली जाते. बोरिवली मतदारसंघात आधी विनोद तावडे, त्यानंतर सुनील राणे यांना संधी दिली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी माझ्याऐवजी पीयूष गोयल यांना संधी दिली. त्यांच्या पाठिशी उभे राहिलो असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी यांनी पुढे म्हटले की, संजय उपाध्याय हे चांगले कार्यकर्ते आहेत आणि पक्षासाठी त्यांनी काम केले आहे. परंतु बोरिवली मतदारसंघात वारंवार अशा प्रकारे खेळ करणे बरोबर नाही, असेही त्यांनी म्हटले.
अपक्ष लढणार की मनधरणी होणार?
गोपाळ शेट्टी अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांनंतर रात्री उशिरा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेत मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. आज, 29 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आता, शेट्टी हे बंडाचे निशाण फडकवणार की पक्ष आदेशाला मान्य करत तलवार म्यान करणार हे आज स्पष्ट होईल.
