मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक, विशेषत: महिला आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र झाले होते. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फटका बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे.
भाजपची विशेष रणनीती
मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे भाजप ला फटका बसू शकतो याचा अंदाज आल्याने भाजपने विशेष रणनीती आखली आहे. केंद्रातून ठाण मांडून बसलेल्या खासदार भुपेंद्र यादव आणि शिवप्रसाद यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाडामध्ये बंडखोरीचा फटका किती बसणार यासाठीचे सर्वेक्षण केले आहे. त्यात बंडखोर भाजप आणि शिवसेनेला नुकसान करणार असा अंदाज आहे.
advertisement
नेत्यांवर सोपवली जबाबदारी...
भाजपने मराठवाड्यातील आठ मतदार संघांसाठी खास निरीक्षक नेमले आहे. यात दिग्गज नेत्यांवर जबाबदार सोपवली आहे. भोकरदन आणि बदनापूरसाठी रावसाहेब दानवे, देगलूरसाठी अशोक चव्हाण, केजसाठी प्रीतम मुंडे यांच्यासह 5 जणांची नेमणूक केली आहे. या नेत्यांवर जरांगे इफेक्ट कमी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नेत्यांना मतदारसंघात ठाण मांडण्याशिवाय, दररोजच्या प्रचाराची रणनीती आखण्याची सूचना केली आहे.
एका बाजूला मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात भाजपाविरोधात नाराजी आहे. त्यामुळे ही नाराजी कमी करण्यासाठी भाजपची रणनीती यशस्वी होईल का, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
