एमआयएमकडून राज्यात आपली राजकीय जमीन तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुस्लिम मतदार निर्णायक असलेल्या ठिकाणी एमआयएमकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे. एमआयएमचे राज्यात सध्या दोन आमदार आहेत. तर, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगली मते मिळाली होती. आता, विधानसभा निवडणुकीत एमआयएमकडून आपले संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी काही सभांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयावर टिप्पणी केली. या सगळ्या प्रकारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
advertisement
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवैसींचा समाचार घेताना म्हटले की, सध्या ओवैसी पण इकडं येऊ लागला आहे. माझ्या हैदराबादी भावा, तू तिकडंच थांब, तुझ इथंच काहीच काम नाही. आमच्या राज्यात आम्हाला धमकी देत असून औरंगजेबचे महिमामंडन सुरू असल्याचे फडणवीस यांनी खास आपल्या शैलीत म्हटले. फडणवीस यांनी पुढे म्हटले की, देशातील सच्चा मुस्लिम औरंगजेबला आपला नायक मानत नाही. या महाराष्ट्राने मुघलांचा पराभव केला आहे. हा महाराष्ट्र आहे, तुमचा हैदराबाद नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी ''अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर...अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर'' असे म्हणत बोचरा वार केला.
फडणवीस यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्राने याआधीच त्यांना पराभूत केले आहे. आता, त्यांना विजयाची स्वप्ने पडत असतील तर आम्ही ती होऊ देणार नाही. आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण, जर कोणी औरंगजेबला श्रद्धांजली देत असेल तर आम्ही सहन करणार नसल्याचे फडणवीस यांनी ठणकावले.
