शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात हायव्होल्टेज लढत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आज वरळी कोळीवाड्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे गटावर आरोप केला.
advertisement
वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांचे कार्यकर्ते वरळी कोळीवाड्यात मतदारांना भांडी वाटप करत असताना त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडलेली भांडी पोलिसांना दाखवली. मात्र, पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला.
वरळी कोळीवाड्यातील या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मतदारांना एक कूपनच्या माध्यमातून भांडी वाटप केले जात असल्याचा दावा व्हिडीओतून करण्यात आला आहे. एका घरातून हळदी कुंकूची भेटवस्तू म्हणून शिंदे गटाकडून भांडी वाटप सुरू असल्याचा आरोप करण्यात आला.
