सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेला डॉली चहावाला याने नागपूरमध्ये थेट भाजप उमेदवाराच्या प्रचारात हजेरी लावली. भाजपचे नागपूरचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह तो व्यासपीठावर दिसून आला. भाजपच्या पन्ना प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी डॉली चहावालाने हजेरी लावली होती.
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉली चायवाला हा व्यासपीठावर दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
advertisement
भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विजयवर्गीय यांनी डॉलीचे नाव विशेष घेतले नसले तरी तिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे आता डॉली चायवाला भाजपमध्ये सहभागी झाला आहे की तो प्रचाराचा एक भाग आहे? हे स्पष्ट झाले नाही. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनाही चहा पाजला...
डॉली चायवाला याने याच वर्षी एप्रिलमध्ये गुरुग्राममध्ये युट्युब सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर मीटमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना आपल्या स्टॉलवरील खास चहा दिला.
बिल गेट्स यांनीही घेतली भेट
फेब्रुवारीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी डॉली चायवालासोबतची एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये डॉलीने बिल गेट्स यांनाही आपल्या हाताने चहा तयार करून दिला.
