मंगळवारी, रात्री 11-12 च्या सुमारास हे नाट्य घडलं. गुजरात पासिंगच्या 100 हून अधिक ट्रॅव्हल्स आणि इतर वाहने हे विरार शिरसाड फाट्यावर बाविआच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या. वसई विरारसह मुंबई परिसरातील मतदारांना वेगवेगळे अमिष दाखवून त्यांना मतदानासाठी घेवून जात असल्याचा आरोपही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.
विरार शिरसाड फाटा येथे मध्यरात्री पोलीस ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुजरात पासिंगची वाहने अडवल्यानंतर ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली.
advertisement
बोगस मतदानाची शंका...
गुजरातला लागून असल्याने वसई-विरारसह मुंबईतील काही नागरीक रोजगाराच्या निमित्ताने गुजरातमध्ये आहेत. हे नागरीक मतदानासाठी महाराष्ट्रात आलेत. मात्र, काही ठिकाणी बोगस मतदान होणार असल्याची शक्यता बविआच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या बोगस मतदानासाठीच गुजरातमधून बोगस मतदार आणले जात असल्याची शंका बविआच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
संशयास्पद वाहनात काय आढळलं?
दरम्यान, संबंधित गाड्यांमध्ये कोणतेही आक्षेपार्य साहित्य अथवा संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे त्या गाड्या तपासणी करून सोडून देण्यात आले. ज्या चार गाड्यांची तक्रार होती त्याच्या तक्रारीवरून गाड्यांची तपासणी सुद्धा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात आज मतदान
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
या मतदानासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. या निवडणुकीत 288 मतदारसंघात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमवत आहेत. 9 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 लाख 427 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 288 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
