महायुतीकडून महिला मतदारांना साद...
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहे. त्याशिवाय, महायुती सरकारने महिलांना एसटी बस प्रवासाच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत जाहीर केली आहे. या योजनांचा फायदा महिलांना विशेषत: ग्रामीण भागात होत आहे. लोकसभा निवडणुकीत महागाई आणि इतर मुद्यांवरून दूर गेलेला महिला मतदार खेचण्यासाठी या योजना सुरू झाल्याचे म्हटले जाते. तर, दुसरीकडे महिला मतदारांसाठी महाविकास आघाडीनेदेखील कंबर कसली आहे. महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवत मविआने काही महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत.
advertisement
महाविकास आघाडीची आश्वासने काय?
महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिलांच्या बँक खात्यात दरमहा 3000 रुपये जमा करण्यात येतील. त्याशिवाय, महिलांना राज्यभरात बस प्रवास मोफत करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवरही हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत बेस्टचा प्रवास मोफत करणार असल्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय, महिलांना मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची ऐच्छिक रजा देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करण्यात आले आहे. महाराष्ट्रील महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र महत्वाचा असल्याचे सांगत महिला सुरक्षेवर भर देणार असल्याचे मविआच्या नेत्यांनी म्हटले आहे.
महायुतीने महिलांसाठीच्या लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपये जाहीर केले आहेत. सत्तेत पुन्हा आल्यास लाडीक बहीण योजनेतील रक्कमेत वाढ करून ही रक्कम 2100 रुपये करण्यात येणार आहे. त्याशिवाय, एसटीच्या प्रवासात महिलांना असलेली तिकीट दरातील 50 टक्के कपात सुरू राहणार आहे.
आता विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांचे पारडं कोणाकडे झुकणार, लाडक्या बहिणी महायुतीला साथ देणार की, महालक्ष्मी होऊन महाविकास आघाडीला मतदानरुपी आशिर्वाद देणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
