'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रासोबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी अजित पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी काही उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र लोकशाहीत मतदानाचा प्रत्येकाला हक्क असतो. त्यामुळे जनताच काय ते ठरवेल असे अजित पवार यांनी म्हटले.
advertisement
ओबीसी मतांचे ध्रुवीकरण होणार नाही....
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ओबीसी मते महायुतीकडे येतील का, या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्राने आजवर जातीच्या आधारे मतदान करण्याचे टाळले आहे. एकेकाळी गोपीनाथ मुंडे, अण्णा डांगे, ना. स. फरांदे यांसारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांमुळे वंजारी समाज एकगठ्ठा भाजपच्या मागे उभा राहिला. मात्र, तेवढ्या प्रमाणात आता घडेल, असे वाटत नाही,’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात जातीच्या आधारे मतदान होत नाही. त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजाचे एकगठ्ठा मतदान महायुतीच्या बाजूने होईल असे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे' चालणार नाही
भाजपकडून व्होट जिहाद आणि 'बटेंगे तो कटेंगे’ चा प्रचार सुरू आहे. त्यावर बोलताना अजित पवारांनी म्हटले की, याबाबत आम्हीच यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. उत्तर भारतात कदाचित हा मुद्दा चालेल, पण आपल्या राज्याची पार्श्वभूमी वेगळी आहे. आमची विचारसरणी ही शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांना मानणारी असून, हीच विचारधारा राज्याला पुढे नेईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले.