धाराशिव भूम परंडा मतदार संघात वंचितच्या उमेदवाराचा महायुती व महाविकास आघाडीला बसला फटका बसला. विजयी उमेदवाराचे मताधिक्य कमी झाले. तर महाविकास आघाडीच्या कोट्यातील मते घेतल्याने, त्यांना थोडक्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. डॉ. तानाजीराव सावंत 1 हजार 509 मतांनी विजयी झाले. तर, मविआचे राहुल मोटे सलग दुसऱ्यांदा पराभूत झाले.
तानाजी सावंत यांना 1 लाख 3 हजार 254 मते मिळाली. तर, राहुल मोटे यांना 1 लाख 1 हजार 745 मते मिळाली आहेत. तर, वंचितचे प्रवीण रणबागुल यांना 12 हजार 698 मते पडली. सावंत व मोटे यांच्यात केवळ 0.63 टक्के मतांचा फरक राहिला, 1510 मतांनी सावंत विजयी झाले.
advertisement
हिंगोली विधानसभेत महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या रूपालीताई पाटील यांना पराभूत केले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश थोरात हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. तानाजी मुटकुळे(महायुती) यांना 74584 मते, रूपालीताई पाटील (महाविकास आघाडी) यांना 63658 मते मिळाली. तर, महायुतीचे तानाजी मुटकुळे यांचा 10926 मतांनी विजय झाला. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश थोरात यांना 23944 मते मिळाली.
बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघात वंचितने महाविकास आघाडीचे विजयाचे गणित बिघडवले. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच विजयाच गणित जुळलं. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांना 31 हजार 223 मते पडली. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित दुसऱ्या नंबर वर राहिले. महायुतीचे विजयसिंह पंडित यांना 1 लाख 16 हजार 141 मते मिळाली. तर, महाविकास आघाडीचे बदामराव पंडित यांना 73 हजार 751 मते मिळाली. वंचितच्या प्रियंका खेडकर यांना 31 हजार 223 मते मिळाली.
कॉंग्रेसच्या अमित देशमुखांना वंचितमुळे चांगलच फटका बसलाय. दलित वोट बँक वंचितच्या खिश्यात गेल्याने फक्त 7073 च्या लीडवर देशमुखांना खाली यावं लागलंय. हा अमित देशमुखांचा निसटता विजय मानला जातोय. भाजपृने डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे लिंगायत मतदार एकवटला. कॉंग्रेसच्या अमित देशमुखांना 1 लाख 12 हजार 618 एवढी मते मिळाली. तर, भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांना 1 लाख 05 हजार 545 एवढी मते मिळाली. वंचितचे उमेदवार विनोद खटके यांनी 26 हजार 357 मते घेत काँग्रेसचे मताधिक्य कमी केले.
वंचितमुळे नांदेड मध्ये नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिणचे काँगेसचे उमेदवार पडले. नांदेड उत्तर मध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार अवघ्या 3502 मतांनी पराभूत झाले. शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांना 83 हजार 184 मते मिळाली . अब्दुल सत्तार यांना 79 हजार 682 मते मिळाली . तर वंचितचे प्रशांत इंगोले यांना 24 हजार 266 मते मिळाली.
नांदेड दक्षिण मध्ये काँगेसचे विद्यमान आमदार असलेले मोहन हंबर्डे यांचा 2132 मतांनी पराभव झाला. शिवसेनेचे आनंद तिडके यांना 60 हजार 445 मते मिळाली. काँग्रेसचे मोहन हंबर्डे यांना 58 हजार 313 मते मिळाली. नांदेड दक्षिणमध्ये वंचितने फारुख अहमद हा मुस्लिम उमेदवार दिला. या मतदार संघात वंचितचे फारुख अहमद यांना 33 हजार 841 मते मिळाली.
जिंतूर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांना वंचितने घेतलेल्या मतांमुळे पराभवाला समोर जावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे हे ओबीसी समाजामधून येतात. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीला त्यांचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसेल असे बोलले जात होते. परंतु निकालानंतर विजय भांबळे यांच्या पराभवांच्या कारणांमध्ये वंचितने घेतलेली मतांची आकडेवारी सुद्धा कारणीभूत ठरत आहे. भाजप उमेदवार मेघना बोर्डीकर यांना 1 लाख 13 हजार 432 मते मिळाली. तर, विजय भांबळे यांना 1 लाख 08 हजार 916 मते मिळाली. वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांना 56 हजार 474 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भांबळे यांचा 4616 मतांनी पराभव झाला.
